नाशिक-
अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. केतकीच्या पोस्टवरुन सर्वस्तरातून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तिचा समाचार घेतला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही केतकीच्या पोस्टबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांवर सोशल मीडियातून अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना खरंतर लाजा वाटल्या पाहिजेत. अशा लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.
'तिला चोप दिल्यानंतरच मनाला शांती मिळेल', रुपाली पाटील यांनी केतकी चितळेचे संस्कारच काढले!
अभिनेत्री असो अथवा कुणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे अत्यंत चीड आणणारे आहे. यामागे मनुवाद तर नाही ना? हे तपासलं पाहिजे, अशीही मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्लीत आज हनुमान चालीसा पठण केलं त्यावरही भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली. "नवनीत राणांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्या हनुमान चालीसा पंतप्रधानांच्या घरी जाऊन बोलल्या तरी काही हरकत नाही. वाईट वाटायचं कारण नाही. फक्त त्याचं राजकारण करू नये, भक्तिभावाने हनुमान चालीसा पठण करावे", असं भुजबळ म्हणाले.