पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दिलेल्या वेळेत दुकान बंद न केल्यामुळे पिंपळगाव महसूल, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, शहरातील ४ किराणा दुकानांवर कायदेशीर कारवाई करून दुकाने सील करण्यात आली आहेत.
तसेच बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांवरदेखील कारवाई केली असून, यात २३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काही व्यावसायिक या नियमांचे उल्लंघन करत आपले दुकान दुपारी १२ नंतरसुद्धा सुरू ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने अखेर ग्रामपालिका महसूल व पोलीस प्रशासनातर्फे ४ किराणा दुकानांवर वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत ही दुकाने सील करण्यात आली. यावेळी पिंपळगाव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, मंडल अधिकारी नीलकंठ उगले, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, तलाठी राकेश बच्छाव व ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते.