----
अवामी पार्टीचा रास्ता रोको
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी अवामी पार्टीने रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. चाळीसगाव फाटा ते टेहरे चौफुली दरम्यान अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, यासाठी अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
-----
इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संताप
मालेगाव : शहरात पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. या दरवाढीच्या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट बाजारपेठेवर होत आहे.
----
सक्तीची वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी
मालेगाव : शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जात आहे. देयके न भरणाऱ्या ग्राहकांची वीज खंडित केली जात आहे. या कारवाईमुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार बुडाला आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या ग्राहकांकडून सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे.
---
अक्सा कॉलनीत दिवसा पथदीप सुरू
मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनीत दिवसाही पथदीप सुरू राहात आहेत. यामुळे विजेचा अपव्यय होत असून, गेल्या तीन दिवसांपासून रात्रं-दिवस पथदीप सुरू आहेत. याचवेळी घरगुती वीज पुरवठा कमी-अधिक दाबाने होत असल्याने विद्युत उपकरणे, दूरदर्शन संच, बल्ब जळून नुकसान होत आहे. खासगी वीज कंपनीने ही विजेची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----
महात्मा फुले स्मारक उभारण्याची मागणी
मालेगाव : येथील मोसम पूल परिसरातील प्रभाग १ कार्यालयाजवळ महात्मा फुले स्मारक उभारावे, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्मारक उभारणीची मागणी केली जात आहे. महासभेने स्मारक उभारणीचा ठराव मंजूर करुन कामाला गती द्यावी, अशी मागणी नगरसेवक विजय देवरे, कैलास तिसगे, गुलाब पगारे, भरत पाटील, उत्तम कचवे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
----
मनपा निवृत्तिवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
मालेगाव : महापालिकेच्या निवृत्तिवेतनधारकांनी महापालिका प्रशासनाकडे हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी केले आहे. निवृत्तिवेतनधारकांनी सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, शिक्क्यासह २० फेब्रुवारीपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
----
मालेगाव बाजारपेठेत वाढली गर्दी
मालेगाव : लग्नसराईची धामधूम सुरू झाल्याने येथील कापड व सराफ बाजारात गर्दी वाढली आहे. कोरोना काळात बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सध्या लग्नसराईची धामधूम असल्याने बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.