नाशिक : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर शासकिय नोकरी करत असताना १९८६ ते २०१२ या कालावधीदरम्यान शहर व परिसरात पदाचा गैरवापर करुन उत्पन्नाच्या ७० टक्के इतकी अपसंपदा जमविल्याची खात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पटल्याने संशयित अधिकारी शामराव शेटे व त्यांच्या पत्नीविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, नाशिक येथे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असताना शेटे यांनी पदाचा दुरूपयोग करत ६९ लाख १७ हजार २२८ रुपये त्यांनी उत्त्पन्नापेक्षा अधिक जमविल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एकूण मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याचा विचार करता कायदेशीर मार्गाने ९७ लाख ५३ हजार ६४३ रुपये उत्त्पन्न त्यांना मिळाले. त्यातून त्यांचा व कुटुंबियांचा खर्च वजा जाता त्यांच्याकडे ४६ लाख ८५ हजार ४५५ रुपये शिल्लक असल्याचे आढळले. त्यांनी संपादित केलेली मालमत्ता, १कोटी १६ लाख २ हजार ६८३ इतकी वजा जाता त्यांचे शासकिय नोकरीच्या कालावधीत ६९लाख १७ हजार २२८ रुपये अर्थात ७०.९१ टक्के इतकी अपसंपदा जमविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. शेटे यांनी ही संपत्ती स्वतसह पत्नी शर्मिला यांच्या नावावर केली. अपसंपदा जमविण्यासाठी शर्मिला यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शेटे सध्या अंधेरीच्या (मुंबई) प्रादेशिक कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरिक्षक मृदूला नाईक करीत आहेत.
‘लाचलुचपत’कडून कारवाई : असिस्टंट आरटीओने जमविली ६९ लाखांची अपसंपदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 6:41 PM
नाशिक येथे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असताना शेटे यांनी पदाचा दुरूपयोग करत ६९ लाख १७ हजार २२८ रुपये त्यांनी उत्त्पन्नापेक्षा अधिक जमविल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ठळक मुद्देनोकरीच्या कालावधीत ६९लाख १७ हजार २२८ रुपये संपत्ती स्वतसह पत्नी शर्मिला यांच्या नावावर केली