नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस बुधवार (दि. 21) पासून प्रारंभ झाला असून, या परीक्षेत शिक्षण मंडळाने पहिल्याच दिवशी 13 कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली आहे. नाशिक विभागात 226 परीक्षा केंद्रांवर एक लाख 68 हजार 220 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख 60 हजार 660 नियमित विद्यार्थी असून, साडेसात हजार पुनर्परीक्षार्थी आणि 6 हजार 787 खासगी विद्याथ्र्याचा समावेश आहे. विभागातील 987 ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन 226 केंद्रांवर करण्यात आले आहे. बारावी अभ्यासक्र माच्या चारही विद्या शाखेत कला शाखेतून सर्वाधिक विद्यार्थी असून, त्याखालोखाल विज्ञान शाखेतून सर्वांत जास्त परीक्षार्थी आहेत. विभागीय मंडळामार्फत चारही जिल्ह्यांना प्रत्येकी एक समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकासोबत सीसीटीव्ही कॅमेराही असणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोर्डाने यंदा कडक धोरण निश्चित केलेले असून, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचून आपल्या आसन क्रमांकावर बसून घेतले होते. उशिरा येण्याऱ्या विद्यार्थ्यांची उशिराच्या कारणांची शहानिशा करून प्रवेश दिला जाणार असला तरी विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी वेळवरच पोहचण्याचा प्रयत्न केला.नाशिक जिल्ह्यातून 74 हजार परीक्षार्थीबारावीच्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून 74 हजार 322 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यासाठी जिल्हाभरात 89 परीक्षा केंद्रांवर आसन व्यवस्था करण्यात आली असून, बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पहिला पेपर इंग्रजी भाषेचा घेण्यात आला. ही परीक्षा 20 मार्चपर्यंत चालणार आहे.कॉपीबहाद्दरांवर कारवाईबारावीची यंदाची परीक्षा ही कॉपीमुक्त व्हावी आणि गतवर्षीसारखे सोशल मीडियावर प्रश्नप्रत्रिका व्हायरल होण्यासारखे गैरप्रकार टळावेत यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्यातून 3, नाशिक जिल्ह्यातून तीन व धुळे जिल्ह्यातून 5 कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तर नंदुरबार जिल्ह्यातून मात्र कोणताही विद्यार्थ्यांनी नक्कल करताना आढळला नाही. नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका काढून घेत त्याची तपासणी करून पुन्हा नवीन उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली.