येवला : पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला.पंचायत समितीच्या सभागृहात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना गटप्रमुख मंगेश भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार, अनिता काळे, कविता आठसेरे, आशा साळवे, उपसभापती लक्ष्मीबाई गरूड, नम्रता जगताप, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख होते.बैठकीत विविध विभागांची माहिती घेण्यात आली. समाज कल्याण विभागाचा आढावा घेत असताना दलितवस्तीच्या कामासंदर्भात आलेल्या तक्र ारींवरून गायकवाड यांनी अधिकारी व बांधकाम ठेकेदारांना धरेवर धरले. प्रस्ताव दाखल करताना ठेकेदार हातोहात प्रस्ताव दाखल करतात. पंचायत समितीमध्ये याची कुठलीही माहिती नसते. त्यामुळे यापुढे येणारे प्रस्ताव पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेवून पुढे जिल्हा परिषदेला पाठवण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दलितवस्तीतील विकासकामांचीही चौकशी करण्यात येणार असून, गुणवत्ताशून्य सर्व कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येणाºया कृती आराखड्यामध्ये गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शिक्षण विभागाचा आढावा घेताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता न सुधारल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.घरकुल योजनांसाठी प्रस्तावाचे आवाहनसद्य:स्थितीत सुरू असलेली कामे व पूर्ण झालेली कामे यामध्ये दलितवस्तीत भौतिक गोष्टी करण्यासाठी ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाने कामे करण्यात आलेली नसतील तर या सर्व कामांची चौकशी करून कारवाई करणार येईल. ज्या गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते त्या गावांना पाण्याच्या सोयीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. रमाई योजनेंतर्गत चालू वर्षी ३००, तर शबरी घरकुल योजनेतून २७ घरकुले होणार आहेत. ज्या गावांना लक्ष्य दिले आहे त्याप्रमाणे पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले.
विकासकामांचा दर्जा न राखणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:10 PM
पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला.
ठळक मुद्देप्रवीण गायकवाड : येवला पंचायत समितीत आढावा बैठक