नाशिक : वडाळागावात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत नळजोडणी करून दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याबद्दलच्या ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मदिनानगर पाठीमागील भागातील अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करून सदरची जोडणी तोडली.दरम्यान, अनधिकृत नळजोडणी-द्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकादेशीर नळजोडणी संख्या वाढली असल्याची चर्चा होत आहे. त्यातूनच मदिनानगर येथील प्रकार घडला आहे.या भागातील सादिकनगर, ममताजनगर, गुलशननगर पाठीमागील परिसरात अनधिकृत नळजोडणीची स्पर्धा लागली असून, दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे. महापालिकेलादेखील पाणीचोरीची ठिकाणे ज्ञात आहेत, परंतु त्यांच्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. वडाळा परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो रुपयांची पाणीपट्टी बुडत असल्याने या संदर्भात लोकमतने आवाज उठविला होता. त्याची दखल घेत सोमवारी पाणीपुरवठा विभागाने मदिनानगर पाठीमागील परिसरातील मुख्य पाइपलाइनची अनधिकृत नळजोडणी खंडित करून पाइप जप्त केले आहेत.
वडाळागावातील अनधिकृत नळजोडणीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:19 AM