नाशिक : महापालिकेकडून पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई होत असली तरी, त्याचा वापर थांबत नसल्याने आता प्लॅस्टिकची होलसेल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेने १४ जूनच्या अतिवृष्टीनंतर दहा दिवसांत पाच विभागातून ८५ किलो प्लॅस्टिक जप्त करत ४२ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. महापालिकेत प्लॅस्टिक कॅरिबॅग व्यवस्थापन व हाताळणी समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची सर्रास विक्री होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. महापालिकेकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाही शहरात प्लॅस्टिकचा वापर कमी झालेला नाही. त्यामुळे होलसेल विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करतानाच त्यांच्यावर कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अशासकीय सदस्य निशिकांत पगारे यांनी प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालतानाच गोदावरी नदीघाट परिसरात नो प्लॅस्टिक झोन करण्याची सूचना केली.
होलसेल प्लॅस्टिक विक्रेत्यांवर होणार कारवाई
By admin | Published: June 24, 2017 6:23 PM