नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वर्षभराने नाशिकमध्ये आगमन झाले खरे, मात्र त्यांनी स्वत:ही मास्क घातला नव्हता, इतकेच नव्हे तर माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मास्कवर मास्क घातल्याचे बघितल्यानंतर त्यांना अशोकराव मास्क काढा, असे आदेश दिले. त्यामुळे त्यांनीच नव्हे तर अन्य पदाधिकाऱ्यांनीही तत्काळ त्यांचे अनुकरण केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टाच्या विवाह सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी (दि. ५) सकाळी पाथर्डी फाटा येथे आगमन झाले. त्या वेळी हा प्रकार घडला. राज यांच्या स्वागतासाठी अगोदरच कार्यकर्ते जमलेले होते. राज यांची मोटार येताच गर्दी झाली, त्या वेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मुर्तडक यांनी पुष्पगुच्छ दिल्यानंतर राज यांनी त्यांचे दोन मास्क बघून ते काढण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी तर ते काढलेच, परंतु अन्य पदाधिकाऱ्यांनीदेखील ते काढून घेतले. कोरोनामुळे मुळातच आरोग्य नियमांचे पालन शासनाने बंधनकारक केले असून मास्कची सक्ती कायम आहे. नाशिकमध्ये तर कोरोना संसर्ग वाढल्यावर मास्क न वापरणाऱ्यांना दाेनशे रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे, अशा स्थितीत मास्क काढण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे आरोग्य नियमांचे पालन होते किंवा नाही हे बघण्यासाठी महापालिकेची दोन पथकेही या ठिकाणी दाखल झाली. मात्र, कार्यकर्त्यांचा जोश बघून कारवाईचे धाडस न करताच परत गेली.
महापालिकेचे पथक माघारी परतल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना तेथून हटवितानाच मास्क लावण्यास सांगितले. मात्र त्यांना फारसे कोणी जुमानले नाही. परिणामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन माईनकर या ठिकाणी आले. त्यांनी दटावल्यानंतर काही प्रमाणात कार्यकर्त्यांनी मास्क घातले.
..इन्फो...
बंद दाराआड महापालिका निवडणुकीची तयारी
राज ठाकरे यांनी आगमनानंतर बंद दाराआड महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
इन्फेा....
चोरट्यांची मांदियाळी
राज ठाकरे यांचा दौरा म्हटला की गर्दी असे समीकरणच ठरले असून त्याचाच फायदा घेत तीन कार्यकर्त्यांची पाकिटे चोरट्यांनी लांबवली. एका कार्यकर्त्याच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने संशयास्पद हालचाल वाटलेल्या एका व्यक्तीला हटकले आणि पाठलाग करून पकडले तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्याच्याकडे पाकीट आढळले नाही. त्याने ते फेकून दिले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.