- किशोर इंदोरकर मालेगाव कँँम्प:- शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना जिल्हा बँक अपहार प्रकरण गुन्ह्यात भोपाळ तेथे ताब्यात घेण्यात आले. रात्री त्यांना न्यायालयात आणणार असल्याचे पडसाद शहर व तालुक्यात उमटले. सायंकाळी सात वाजेनंतर हिरे समर्थकांनी संताप व्यक्त करत कँम्प रस्त्यावर निषेध व्यक्त करत मोठी गर्दी केली.
रस्ता रोको सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. याप्रसंगी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.
अद्वय हिरे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी रेणुका सूतगिरणीवर साडेसात कोटींचे कर्ज उचलले होते. परंतू, ते न फेडल्याने ही रक्कम ३० कोटींवर गेली होती. यामुळे हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात हिरे यांनी हायकोर्टात जामीनासाठी धाव घेतली होती. परंतू, हायकोर्टाने तो नाकारला होता. यानंतर हिरे यांनी अटक टाळण्यासाठी मध्य प्रदेश गाठले होते.