सा धारणत: २० ते २२ वर्षांपूर्वी माकपचे एक उमेदवार उभे होते. त्याअगोदर दोन ते तीन वेळा आदिवासी भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. वास्तविक पाहता आमच्या पक्षाला आर्थिकदृष्ट्या निवडणूक लढविणे जिवापलीकडचे ठरणारे होते. परंतु अधिकाधिक शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पक्षाने कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती. त्याकाळात निवडणुकीत आजच्यासारखी आधुनिक प्रचारयंत्रणा नव्हती. तसेच अफाट खर्चदेखील फारसे कुणी करत नव्हते. परंतु भांडवली पक्ष जास्त खर्च करून शकत होते. याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आमच्या पक्षाने हिमतीने पाऊल टाकले. सुमारे तीनशे ते चारशे कार्यकर्ते आपापल्या घरून शिदोºया घेऊन वेगवेगळ्या तुकड्या करून निरनिराळ्या तालुक्यांमध्ये गावोगावी पायी फिरून ठिकठिकाणी प्रचारसभा घेत होते. मुक्कामाच्या ठिकाणी मोठे गाव पाहून थांबत असत. एखाद्या कार्यकर्त्याचे घर बघून त्यांच्याच घरी भाजीभाकरीचे जेवण करून तेथेच मुक्काम करत असत. प्रसंगी पायी, तर प्रसंगी सायकल किंवा एसटीने प्रवास करून कार्यकर्ते एकत्र जमत. त्यासाठी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन काम करत. मतदारांच्या भेटीगाठी, पत्रकवाटप, गावोगावच्या छोट्या-छोट्या सभा घेतल्या जात होत्या. छोट्या छोट्या सभांचा खर्च हे तेथील स्थानिक कार्यकर्तेच करत असत. त्यासाठी डाव्या चळवळीच्या संघटनांचे मोठे सहकार्य मिळत होते. त्याच काळात नाशिक जिल्ह्यात पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची सभा घेण्याचे ठरले. सभेसाठी पक्षाच्या मानाने खूप खर्च झाला. पक्षाने सर्व निधी पुरविला; परंतु कोणत्याही नेत्याने आणि कार्यकर्त्याने कुरकुर केली नाही. पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही तरी उमेदवाराचे कार्य आणि पक्षाचे विचार मात्र घराघरांत आणि गावागावात पोहचले हेच आमच्यासाठी खूप काही होते. आजच्या काळात निवडून येण्यासाठी होणारा वारेमाप खर्च पाहता, रात्रंदिवस कार्यकर्ते गावोगावी पायी फिरत होते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु असे त्याकाळात घडले हे वास्तव आहे.
कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पायी फिरून केला प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:49 AM