नाशिक : मुळचे घोटी येथील रहिवासी मात्र मागील अनेक वर्षांपासून शहरातील सारडासर्कल परिसरात स्थायिक झालेले उर्दूचे गाढे अभ्यासक आणि विविध उर्दू कवींच्या साहित्याची खोली जाणून घेणारे उर्दू भाषेचे सेवक आदम मुल्ला उर्फ बाबा यांचे वयाच्या ८७व्या वर्षी रविवारी (दि.१२) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच उर्दू साहित्यक्षेत्रात शोककळा व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवाचे दफनविधी करण्यात आले.आदम मुल्ला हे एका व्यावसायिक कुटुंबातील व्यक्तीमत्व. त्यांचे बालपण मुंबईत गेले. सुरूवातीच्या काळात घोटी येथे भातगिरणीचा त्यांनी व्यवसाय चालविला. कालंतराने ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. शिंगाडा तलाव-मनोहर मार्केट परिसरातील ग्रीन लॉन्स येथे त्यांचे निवासस्थान. नाशिकमध्ये उर्दू भाषेवर प्रेम करणारे खूप लोक आहे, मात्र त्याचे जाणकार कमी असल्याचे आदमजींच्या निदर्शनास आले. त्यांनी आपल्या उर्दूच्या अभ्यासाचा फायदा उर्दू भाषेच्या विकासासाठी करायचे ठरविले. दरम्यानच्या काळात जुने नाशिकमधील फाळकेरोडवरील ज्येष्ठ उर्दू शायर गुलाम जोया, नासीर शकेब, अॅड.नंदकिशोर भुतडा, राम पाठक यांच्यासारख्या शायरवर्गांशी त्यांचा संपर्कच नव्हे तर मैत्री झाली. जोया, भुतडा कुटुंबियांशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध जुळले होते. बज्मे यारॉँ या नावाने त्यांनी उर्दू साहित्याला वाव देण्यासाठी संस्थाही स्थापन केली होती. या संस्थेअंतर्गत त्यांनी नेहमीच उर्दूच्या विकासासाठी मुशायरे घेतले. गुलाम जोया हे नेहमी प्रसिध्दीपासून दूर राहिलेले शायर. मिठाईचे दुकान चालविणारे जोया, यांची ओळख मुल्ला यांच्याशी झाली त्यानंतर त्यांनी त्यांच्या रेंगते लम्हे, देर-सवेर हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.नाशिकमध्ये उर्दूला जीवंत ठेवण्याचे काम आदममुल्ला यांनी केले, असे म्हणणे वावगे ठरू नये. त्यासाठी उर्दूची प्रामाणिक उपासना करत त्यांनी उर्दूची संस्कृती लोकांमध्ये रूजविण्याचे पुरेपुर प्रयत्न केले. उर्दू शायरी मुल्ला यांनी स्वत:हून कधी रचली नाही; मात्र प्रत्येक उर्दू शायरच्या शायरीमधला मतितार्थ, भावार्थ मुल्लाजी चपखलपणे वर्णन करत असे. उर्दूसह अरबी, मराठी, इंग्रजी, फारसी, बंगाली या भाषांवरदेखील त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, बहीणी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
--आदम बाबा यांच्यासारखी दुसरी व्यक्ती होणे नाही. ऐसा कहां से लाये, के तुझसा कहें उसे....,
रस्मे उल्फत सिखा गया कोई,दिल की दुनिया बसा गया कोई,वक्त-ए-रूख्सत गले लगा कर, हंसते हंसते रूला गया कोई -सुनील कडासने,अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
हजारो शेर तोंडपाठ असणारे आदमभाई हे स्वत: एक मैफल (नशिश्त) होते. बिछडा कुछ इस अदा से, कि रूत ही बदल गयी, इक शख्स सारे शहर को वीरान कर गया... - अॅड. नंदकिशोर भुतडा,उर्दूवर अस्सल प्रेम करणारा व शायरीची कलेची पारख असणारा मित्र गमावला. गलियां उदास-उदास हैं, सुनसान रास्ते...रौनक ही ले गया हैं, वो बस्ती से क्या गया... -नासिर शकेब,ज्येष्ठ शायर