नाशिक : अवघ्या सव्वा महिन्यांपुर्वी आडगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची तडकाफडकी तक्रार निवारण कक्षात बदली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांची त्यांच्या रिक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आडगावच्या तीघा पोलिसांनी औरंगाबादला जाऊन लाचेची रक्कम स्विकारल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याचा ठपका मोरे यांच्यावर ठेवण्यात आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केली, अशी चर्चा आहे.दहा दिवसांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व अन्य तिघे पोलीस कर्मचारी औरंगाबाद जिल्ह्यात एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. याठिकाणी संशियत आरोपीला दुस-या गुन्ह्यात न अडकविण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्विकारताना या चौघा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा ठपका मोरे यांच्यावर ठेवला गेल्याने वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी त्याची गंभीर दखल घेत मोरे यांना थेट तक्रार निवारण केंद्रात बसविल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. मोरे यांची बदली ही प्रशासकीय कारणास्तव केली गेल्याचे बोलले जात असले तरी दुसरीकडे मात्र पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व तिघा पोलीस कर्मचा-यांच्या लाचखोरीमुळे मोरे यांच्यावर बालंट आल्याने त्यांना बदलीला सामोरे जावे लागत असल्याची जोरदार चर्चा आडगाव पोलीसांत सुरू आहे.आडगाव पोलीस ठाणे नेहमीच अनेकविध कारणाने चर्चेत राहत आले आहे. या आठवड्यात या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांचे कार्यक्रम होत आहेत. यामुळे तपोवन परिसर अतीसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने आलेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांच्यापुढे चोख बंदोबस्त आणि अन्य अधिकारी, कर्मचा-यांना स्वयंशिस्तीचे धडे देण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.
आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोरे यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 2:17 PM
आडगावच्या तीघा पोलिसांनी औरंगाबादला जाऊन लाचेची रक्कम स्विकारल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याचा ठपका...
ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाणे नेहमीच अनेकविध कारणाने चर्चेत पोलीस कर्मचा-यांच्या लाचखोरीमुळे मोरे यांच्यावर बालंट