नाशिक : शहरासह जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळा शासनाचे सर्व नियम डावलून दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापेक्षा अधिक रकमेची मागणी करीत असल्याचा आरोप नाशिक जिल्हा पालक संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून तक्रारही करण्यात आली आहे.
दहावीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या अज्ञानाचा व असाहाय्यतेचा गैरफायदा घेत शैक्षणिक संस्थांकडून नियमबाह्य शालेय शुल्क वसूल करून अडवणूक केली जात आहे. ही पालकांची आर्थिक लूट असल्याचा आरोप नाशिक पालक संघटनेने केला असून अशाप्रकारचे शुल्क जमा केल्याशिवाय बोर्ड परीक्षेचे फार्म भरले जात नाही. शाळेने नफेखोरी करण्यासाठी आकारलेले शुल्क पालकांनी भरण्यास विरोध केल्यास संबंधित पालकांच्या पाल्यांचे अर्ज अडवले जात असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांच्या शालेय गुणदानातील कपातीची भीती पालकांना दाखविली जात असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा पालक संघटनेनेच अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.