समाजात बुद्धी वापरून सकारात्मक काम करणाऱ्यांचे प्रमाण थोडे असते. पण तेच थोडे लोक समाजात पुढे येत असतात. बुद्धीच्या कामात वाचन, चिंतन आणि लेखन यांचा समावेश होतो. पुष्कळ लोक वाचावयास तयार असतात. त्यातील थोडे लोक जरा पुढे जाऊन चिंतन करू शकतात. पण चिंतन करावयास एकाग्रता व बुद्धीचे कष्ट लागतात. त्यामुळे चिंतकाचे किंवा विचारवंतांचे प्रमाण समाजात थोडे असते. त्यातही वकील वर्गात हे प्रमाण अत्यल्पच म्हणावे लागेल. चिंतनातून लेखक तयार होतात. कारण क्र माक्र माने वाचन, चिंतन व लेखन या कार्यात अधिकाधिक बौद्धिक कष्ट पडतात. असे चिंतन करून लेखन करणारे जे थोडे लोक आहेत त्यांच्यात आपल्याला लक्ष्मणराव उगावकर यांचा समावेश करणे आवश्यक ठरते.सामान्यपणे चांगल्या कामाबद्दल समाजामध्ये आदराची भावना असते. थोड्याही सत्कृत्याबद्दल समाजाला कौतुक व कृतज्ञता वाटते. अशी कृतज्ञता एखाद्या विशेष प्रसंगी ही आदराची भावना उत्कट स्वरूप धारण करून सत्काराच्या मार्गाने व्यक्त होते. आप्पांनी १९५४ साली पिंपळगावी वकिली सुरू केली. निफाडला सिव्हिल कोर्ट स्थापन झाल्यानंतर ते निफाडला काम करू लागले. तेथे ते निष्णात वकील म्हणून प्रसिद्धीस आले. न्यायाच्या शाखांमध्ये म्हणजे टेनन्सी, फौजदारी, सिव्हिल, रेव्हेन्यू, सहकार, ग्राहक न्यायालय, चॅरिटी कमिशन अशा विविध न्यायालयांमध्ये वकिली केली. त्यातच भारतीय रेल्वेचे वकील म्हणूनही त्यांनी काम केले आणि त्या निमित्ताने ते नाशिकला स्थलांतरित झाले. रेल्वेचे वकील म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला. ही झाली वकिली क्षेत्रातली कामगिरी, जी आजही चालू आहे !निफाडचे १० वर्षे व्हिलेज पंचायतीचे सदस्य असताना त्या ठिकाणची पाणी योजना प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवून कार्यान्वित केली. त्याबरोबरच त्यांनी निफाडसह नाशिक येथे सहकार, सामाजिक कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. नऊ वर्षे तालुका विकास बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी सहकारी संस्थेचे माध्यमातून सिंगापूर आणि झीब्राटल या देशांना कांदा निर्यात करण्याची देशात प्रथमच सुरु वात केली. शेतकरी कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि निफाड येथे सहकारी साखर कारखाना काढणे यासाठी अविरत यशस्वी प्रयत्न केले. निफाड येथे न्यायमूर्ती रानडे स्मरणार्थ संस्था काढून ती नामवंत बनविली, तर नाशिक येथे ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नावाची शैक्षणिक संस्था काढून ती सौ. अंजली आणि गोपाळ पाटील व इतरांच्या सहाय्याने कार्यरत आहे. या व अशा विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे ते नाशिककरांमध्ये ख्यातनाम झाले आहेत. नाशिककरांना विविध क्षेत्रातील कामांमुळे त्यांचा अभिमान आहे.आपले जीवन हे सुखदु:खांचे मिश्रण आहे. यश व अपयश, कीर्ती व अपकीर्ती, स्तुती व निंदा, लाभ व हानी, असे दोन्ही प्रकार लहान-मोठ्या प्रमाणात आजन्म चालू असतात. याची आप्पासाहेबांना यथार्थ जाणीव आहे. अशा घटनांनी त्यांचे जीवन भरलेले आहे. आत्मिक उन्नतीशिवाय जगातील यशापयश आणि कर्तबगारी यांना काडीची किंमत नाही हे ते समजून आहेत. प्रसंगानुरूप वागायला पाहिजे. प्रसंग आधी योजून येत नसतात. त्या प्रसंगाला त्या क्षणी विचार करून साजेसे वर्तन झाले पाहिजे. विचार केला की योग्य मार्ग दिसतो. स्वत:विषयीचा विचार, आपले वय, शिक्षण, अनुभव, समाजातील दर्जा आणि आपण पाळावयाची तत्त्वे यांना अनुलक्षून आपण वागले पाहिजे. सुशिक्षिताने समाजात कसे वागावे याविषयी समाजाच्या काही अपेक्षा असतात. आदी बाबीची त्यांना पूर्ण जाण आहे. सामाजिक दृष्टीने आपण विभागलेले आहोत. अथांग समाजाचे हित पाहण्यापेक्षा आपापल्या लहान लहान गटांचा, समुदायाचा स्वार्थ साधण्यात आपण गढून गेलेलो असतो, त्यामुळे नवनवीन जातिभेद निर्माण झालेले आहेत. ते टाळले पाहिजेत, असे त्यांचे आग्रही मत आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ते केवळ वयाने प्रौढ आहेत असे नव्हे तर मनाने खंबीरच नव्हे तर अतिप्रौढ झालेले आहेत. स्वगौरवाच्या पलीकडे गेलेले आहेत. स्वत:च्या सत्कृत्यांचा आणि कर्तबगारीचा त्यांना यथायोग्य आत्मविश्वास आहे. अडचणी व संकटे यामुळे माणसाच्या जीवनाला जे धक्के बसतात त्यातून सुप्त मानवी कर्तृत्वाला आव्हान मिळाल्याने तो जास्त प्रयत्नशील, खंबीर आणि महत्त्वाकांक्षी बनतो तसेच काहीसे आप्पांचे झाले आहे. त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, नाशिक जिल्हा बँक असोसिएशन यांचा एकनाथ ठाकूर पुरस्कार, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा यांचा ज्येष्ठ वकील म्हणून गौरव, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार, या व अशा अनेक सामाजिक संस्थांकडून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या निमित्ताने त्या पुरस्कारांचे स्मरण करणे इष्ट ठरेल.- प्राचार्य रा.शां.गोºहे, नाशिक
अॅड. लक्ष्मणराव उगावकर : एक कार्यमग्न व्यक्तित्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 1:07 AM