नाशिक : शहरात ज्या भागात मलवाहिकांचे जाळे पसरलेले आहे, तेथील मिळकतधारकांनी इमारतीतील सेप्टीक टॅँक थेट मलवाहिकांना जोडावी, असे महापालिकेच्या भुयारी गटार विभागाच्या वतीने मिळकतधारकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर रस्ता खोदण्यास परवानगी मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. शहरात महापालिकेने टाकलेल्या मलवाहिकांना अनेक ठिकाणी सेप्टीक टॅँक जोडल्या गेलेल्या नाहीत. बऱ्याच सेप्टीक टॅँक या भरल्या जाऊन चोकअप होत असल्याने ड्रेनेजचे प्रश्न उपस्थित होतात. त्यासाठी महापालिकेने आता मिळकतधारकांना त्यांच्या इमारतीतील सेप्टीक टॅँक थेट मलवाहिकांना जोडण्यास परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. येत्या ३१ मे पर्यंत सदर सेप्टीक टॅँक मलवाहिकांना जोडून घ्यावे, त्यानंतर मात्र रस्ता खोदकामास परवानगी मिळविण्यात अडचणी उद्भवू शकते. ज्या ठिकाणी मलवाहिकांचे जाळे पोहोचलेले नाही, त्याठिकाणी नवीन मलवाहिका टाकण्यात येईपर्यंत सेप्टीक टॅँकचाच वापर करावा, असेही महापालिकेने कळविले आहे.
मलवाहिकांना जोडा सेप्टीक टॅँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:26 AM