जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : - दिवसेंदिवस मोठ्या शहरांतील रोजगाराची साधने संपुष्टात येत असून, तरुणांचा कल आता ग्रामीण भागाकडे वाढू लागला आहे. शेती व शेतीपूरक उद्योगधंदे करण्यास सुशिक्षित तरुण प्राधान्य देत आहेत. अशाच प्रकारे अत्यंत कमी क्षेत्रात इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक मत्स्यशेतीचा प्रयोग दाभाडी येथील अमोल देशमुख या ध्येयवेड्या तरुणाने यशस्वीपणे केला आहे.
अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर बारा ते तेरा वर्षे देशविदेशात विविध ठिकाणी नोकरी केल्यावर अमोलला मिळालेल्या अनुभवाच्या बळावर व मित्रांच्या सहकार्याने आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीत आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करण्याची प्रेरणा मिळाली. त्याने यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले व विविध मत्स्यशेती प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन, इस्रायली, व्हिएतनाम व चिनी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्याने केवळ सहा गुंठे शेतजमिनीवर पत्र्यांचे मोठे शेड उभे केले. शासनाच्या परवानगीने चीन व व्हिएतनाम येथून यंत्रसामग्री मागविली. या प्रकल्पासाठी मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागते. मात्र, अमोलला अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा, घेतलेल्या अनुभवाचा व मित्रांच्या सहकार्याचा मोठा फायदा झाला. मत्स्यपालनासाठी पाण्याच्या टाक्या, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, याकामी नियमितपणे विद्युतपुरवठा आदींची व्यवस्था झाल्यावर "कोंबडा" या प्रजातीचे मत्स्यबीज टाकले. अशाप्रकारे उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून सदर प्रकल्पाचा खर्च तीस ते पस्तीस टक्के कमी करण्यास मदत झाली. सुरुवातीला जोखीम पत्करून मेहनत घेतल्यास भविष्यात हमखास दहा ते बारा लाख रुपये उत्पन्नाची हमी मत्स्यशेतीने मिळू शकते, असा विश्वास अमोलने व्यक्त केला.
------------------
लहानपणापासून आव्हानात्मक क्षेत्रात काम करण्याची जिद्द होती. व्हिएतनामच्या मित्राकडून सदर प्रकल्पाची माहिती व सहकार्य मिळाले. आधुनिक तंत्रज्ञानाने मत्स्यपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर मागणी असलेल्या माशांच्या प्रजातीची निवड व खात्रीशीर मत्स्यबीज, मत्स्यबीज पाण्याच्या टाकीत सोडण्याची प्रक्रिया, माशाच्या वजनानुसार, ठरलेल्या वेळी खाद्य व्यवस्थापन, पाण्याचा पीएच, प्राणवायू, माशांचे संरक्षण आणि वेळोवेळी केली जाणारी माशांची आरोग्य तपासणी या पंचसूत्रीचा वापर केल्यास निश्चितपणे यश मिळते.
-
अमोल देशमुख, दाभाडी (१९ मालेगाव २)
===Photopath===
190521\19nsk_3_19052021_13.jpg
===Caption===
१९ मालेगाव २