पंचवटी : पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजार समितीत स्थानिक शेतमाल विक्रीसाठी सुरू झाल्याने मेथी आणि कोथिंबीर बाजारभाव घसरले आहेत. शनिवारी (दि.२३) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर आणि मेथी जुडीला पाच रुपयांपासून भाव मिळाल्याने ग्राहक समाधानी झाले असले तरी उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुहेरी बाजारभाव गाठलेल्या मेथी आणि कोथिंबीर मालाचे दर घसरल्याने ग्राहकांना स्वस्तात पालेभाज्या मिळत आहे. बाजार समितीत शेतमालाची आवक नियमित असली तरी परराज्यात आणि परजिल्ह्यात रवाना केल्या जाणाऱ्या मालाला उठाव नसल्याने मंदीचे सावट पसरले असल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.