कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने लक्षणे दिसून येताच कोरोना आजाराशी संबंधित सर्व चाचण्या कमी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. एचआरसीटीचे चाचणीसाठी अडीच हजार शुल्क घेण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, काही डायग्नोस्टिक सेंटरकडून ‘एचआरसीटी’साठी तीन हजार रुपये घेतले जात असल्याचे गोविंद लोखंडे यांनी म्हटले आहे. जागतिक महामारीत रुग्णांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याची लोखंडे यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार पाच हजारांहून अडीच हजार रुपये दर एचआरसीटीसाठी करण्यात आले आहे. शासकीय सुटीच्या दिवशी अर्थात रविवारी तसेच अर्जंट रिपोर्टच्या एचआरसीटीसाठी निर्धारित शुल्काव्यतिरिक्त जादा पैशांची मागणी केली जाते. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये असलेली गर्दी तसेच रुग्णांच्या उपचाराला होणारा विलंब लक्षात घेऊन नातेवाईक जादा पैसे देतात. त्यामुळेच त्यांचे फावत असल्याचे लोखंडे यांनी म्हटले आहे.
इन्फो
नियमित ऑडिटची मागणी
खासगी कोविड रुग्णालयांत रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांवर वॉच ठेवण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. त्याचप्रमाणे एचआरसीटीसाठी निर्धारित शुल्कापेक्षा जादा पैसे आकारण्याविरोधात लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा नेमण्याची गरज असल्याचे लोखंडे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून यांच्या इमर्जन्सीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या लुटीवर वचक ठेवावा, तसेच डायग्नोस्टिक सेंटर्सचे नियमित ऑडिट करण्याची मागणी लोखंडे यांनी केली आहे.