दिंडोरी : वणीतील अतिरिक्त ऑक्सिजन बेड सेंटर लवकरच सुरू होणार असून दिंडोरीतील सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथील प्रस्तावित कोरोना सेंटरची पाहणी करत आरोग्य विभागाचा उपाययोजनांसंदर्भात आढावा घेतला.
तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच असून सरकारी कोविड केअर सेंटरसह खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. नागरिकांमध्ये जागरूकता वाढत नागरिक तपासणी करत आहेत. वेळीच उपचार करत असल्याने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक गावांत विलगीकरण कक्ष सुरू करण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक गावात सर्वेक्षण आरोग्य तपासण्या कराव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला केल्या. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. बोपेगाव सोबतच आवश्यकता भासल्यास पिंपरखेड येथेही कोविडं सेंटर सुरू करण्यात येईल असे सांगितले. दिंडोरी येथील मविप्र विद्यालयातही गरज पडल्यास कोविड सेंटर सुरू करण्यात येईल. नागरिकांनी आजार अजिबात अंगावर काढू नयेत. त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी व वेळेत उपचार घ्यावे. संसर्ग वाढू नये यासाठी गावपातळीवर पोलीस पाटील ग्रामसेवक सरपंच यांनी दक्ष राहत पॉझिटिव्ह रुग्णास उपचारासाठी आवश्यकतेनुसार कोविडं सेंटरला पाठवावे. त्यांचे संपर्कातील व्यक्तींनी चाचणीं करून घेत विलगीकरण करत कुटुंबात गावात संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे, डॉ. विलास पाटील, डॉ. राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते.