मालेगाव : जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रशांत बच्छाव यांच्या मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरट्यांनी मुंगसे, येसगाव परिसरातही घरफोड्या केल्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी जगन्नाथ पंडित बच्छाव, रा. कौळाणे निं. यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी अपर पोलीस अधीक्षक बच्छाव यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली आहे. तसेच परिसरात असलेल्या जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तसेच मुंगसे शिवारात राहणाºया बबन सूर्यवंशी यांच्या घरीही चोरी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन दिवसापूर्वी निमगाव व येसगाव येथे घरफोडी करुन सव्वादोन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. गेल्या दोन दिवसात परिसरात पाच ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. यामुळे तालुका पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या धाडसी घरफोड्यांमुळे शेती शिवारात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बच्छाव यांच्या झालेल्या धाडसी घरफोडीची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस हवालदार हिरे, नितीन पांढरे आदिंनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
मालेगावी अपर पोलीस अधीक्षकांकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:06 AM