पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम अशा आडगाव(भु) येथील शासकीय आश्रमशाळा १५ वर्षांपासून खासगी खोल्यांमध्ये भरत असून आदिवासी विकास विभागाने इमारत मंजूर करून बांधकाम करावे. तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाला मान्यता मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे.
आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आडगाव येथे सातवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून आठवीसाठी मुलांना प्रवेश घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आडगाव येथेच आठवीचा वर्ग सुरू करावा. तसेच शाळेला प्रशस्त इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर्षी प्रवेशापासून वंचित असलेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नजीकच्या आश्रमशाळेत प्रवेश देण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गणेश गवळी, नेताजी गावीत, योगेश भांगरे, देविदास जाधव, पुंडलिक गायकवाड, देविदास हाडस आदी उपस्थित होते.
---------------
अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांना निवेदन देताना गणेश गवळी, नेताजी गावीत, योगेश भांगरे, देविदास जाधव, पुंडलिक गायकवाड, देविदास हाडस आदी. (०२ पेठ ४)
020921\02nsk_29_02092021_13.jpg
०२ पेठ ४