नाशिक : आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्मजवळील नाल्यावरील रस्त्याचा संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या जवळ नाला तयार झाला असून, या वळणावर अनेक छोटे-मोठे अपघात होतात; पण या समस्येकडे स्थानिक नगरसेवक व प्रशासन यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वळणावरील रोडवर संरक्षक कठडा बांधून नाला बुजविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आडगाव-म्हसरूळ रस्त्यावरील ओंकार फार्मजवळील धोकादायक वळणावर असलेल्या रस्त्यालगत असलेला संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे कोसळून बाजूची माती वाहून गेल्याने रस्त्यालगत नाला तयार झाला आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांची अनेक वेळा तारांबळ उडते. शिवाय वळण धोकादायक असल्याने अनेक वेळा अपघातदेखील घडतात. शिवाय हा रस्ता मुंबई-आग्रा महामार्गापासून दिंडोरी, पेठ, गिरणारे, त्र्यंबक, गुजरात या मार्गाकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे नेहमीच या मार्गावर वर्दळीमुळे लोकांचा राबता असतो, शिवाय मेडिकल कॉलेज व रु ग्णालय, ग्रामीण पोलीस मुख्यालय, पोलीस वसाहत, मेट कॉलेज, नर्सिंग कॉलेज अशी कॉलेजेस व प्रशासकीय कार्यालये असल्यामुळे या रस्त्यावर कायम मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी कठडा नसल्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी रस्त्यावर संरक्षक कठडा बांधावा किंवा नाला बुजवावा, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.पावसामुळे रस्ता लक्षात येत नाही आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्म येथील नाल्याजवळील रस्त्यावरील कठडा नाहीसा झाला असून, मुसळधार पावसात पाणी वाहत असते. अशा वेळेस रस्त्याची व पाण्याची लेव्हल एकसारखी असल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची भीती निर्माण होते.अनेक ठिकाणचे पथदीप गायबआडगाव-म्हसरूळ रस्त्यावरील अनेक ठिकाणी खांब उभे करूनही पथदीप बसविण्यात आलेले नाही तर काही ठिकाणी दाट झाडांमुळे प्रकाश पडत नाही, त्यामुळे गरजेच्या ठिकाणी झाडांची छाटणी करून पथदीप नसलेल्या ठिकाणी ते बसविण्यात यावे.
आडगाव-म्हसरूळ रस्ता बनला धोकादायक; अपघाताच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:13 PM