नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे आडगाव येथील नियोजित घरकुल योजनेचे काम वादात सापडले आहे. शुक्रवारी (दि.१४) संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या तयारीचे काम संतप्त ग्रामस्थांनी रोखून धरले. तत्पूर्वी सोमवारी रात्री शैक्षणिक कारणाकरिता ही जागा ग्रामपंचायतीने दिल्याचा फलक ग्रामस्थांनी लावला आहे. आता बुधवारी (दि.१२) आडगाव बंद पुकारण्यात आला असून, सकाळी होणाऱ्या ग्रामसभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.आडगाव शिवारात जुन्या मानोरी रोडवर सुमारे तीन एकर जागा असून, ग्रामंपचायतीने ही जागा सरकार दरबारी दिली तेव्हाच शैक्षणिक कामासाठी त्याचा वापर व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. या भूखंडाजवळच रयत शिक्षण संस्थेची शाळा असून, तिच्या विस्तारासाठी या भूखंडाचा वापर व्हावा, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे या जागेवर शैक्षणिक झोनचे आरक्षण असताना आता ही जागा म्हाडाकडे वर्ग करण्यात आली असून, तशी आॅनलाइन नोंद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येथे घरकुल योजना राबवविण्यात येणार असून, येत्या शुक्रवारी (दि.१४) केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असून, शैक्षणिक कार्यासाठीच ही जागा वापरली जावी अशी मागणी असल्याने सोमवारी ग्रामसभा घेऊन तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रात्री ही जागा ग्रामपंचायतीने शैक्षणिक कारणासाठी दिल्याचा फलक वादग्रस्त भूखंडावर लावण्यात आला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांचा दौरा असल्याने गोपनीय शाखचे अधिकारी ही जागा पाहण्यासाठी गेले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. त्यानंतर आडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सानप दाखल झाले. त्यांनी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला. त्यानंतर आता बुधवारी (दि.१२) ग्रामस्थांनी आडगाव बंदची हाक दिली असून, ग्रामसभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मंगळवारी झालेल्या चर्चेत एकनाथ मते, पोपट शिंदे, पोपट लभडे, बालाजी माळोदे, सुनील जाधव, नितीन माळोदे आदिंसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आडगावच्या ग्रामस्थांनी रोखले काम
By admin | Published: April 12, 2017 1:01 AM