संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात सफाईची कामे करण्यासाठी महापालिकेकडे अनेक वर्षांपासून दोन यांत्रिक झाडू असून, त्याचा पालिकेकडून वापर केला जात नसल्याने एक खत प्रकल्पावर, तर दुसरा भांडारात वापराविना पडून आहे. असे असतानाही महापालिकेतील मुखंड औरगांबादच्या झाडूच्या पाहणीसाठी गेल्याने महापालिकेतील जाणकारच बुचकळ्यात पडले आहेत. आजवर सफाई कामगारांच्या विरोधामुळे आणि त्यातील दोषांमुळे महापालिकेकडे उपलब्ध असलेला एकही झाडू वापरात नसताना आणखी सहा झाडू खरेदी करण्याचे घाट घातले जात आहेत, हे विशेष होय! नाशिक शहराचा वाढता विस्तार आणि सफाई कामगारांची मर्यादित संख्या यामुळे शहरात यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा विषय वेळोवेळी चघळला गेला आहे. महापालिकेने यांत्रिक झाडू खरेदी करायचा केवळ विचार मांडला तरी त्यास सफाई कामगार संघटनांकडून विरोध केला जातो. यानंतरही महापालिकेने २००२ मध्ये शिवाजीरोडवर यांत्रिक झाडूंची प्रात्यक्षिके बघितली, त्यानंतर दोन यांत्रिक झाडू खरेदी केले. हे झाडू महापालिकेच्या खत प्रकल्पावर ठेवण्यात आले होते. परंतु त्याचा फारसा उपयोग केला जात नव्हता. दरम्यान, २०१३ मध्ये नगरसेवक विक्रांत मते यांनी प्रभाग क्रमांक २१ मध्ये यांत्रिक झाडूचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेने त्यांना परवानगी दिल्यानंतर सुमारे महिनाभर या प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री ११ ते पहाटे पाच या वेळात स्वच्छता करण्यात येत असे. ही पद्धत चांगली असल्याने आणखी यांत्रिक झाडू देण्याची मागणी मते यांनी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे केली होती. ती पूर्ण झाली नसली तरी त्यानंतर अगदी एका वर्षापूर्वीपर्यंत सातपूर येथे काही मार्गांवर या झाडूने साफसफाई केली जात होती, असे मते यांनी सांगितले. दुसरीकडे सातपूर विभागातही या झाडूचा वापर कमी कमी होत गेल्याने तो भांडारात जमा असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दुसरा यांत्रिक झाडू आजही खतप्रकल्पावर पडून आहे. यांत्रिक झाडूने धूळ खूप उडते त्यामुळे त्याचा वापर केला जात नसल्याचे खतप्रकल्पावरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या दोन झाडूंचाच वापर केला जात नसताना लवाजमा थेट औरंगाबाद महापालिकेत यांत्रिक झाडूची पाहणी करण्यासाठी गेल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आधीच पडून दोन झाडू, तरीही औरंगाबादला गेले भिडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:17 AM