लोकमत न्यूज नेवर्क
नाशिक : सरकारने शाळा, महाविद्यालयांना दिलेल्या नियमांप्रमाणेच सर्व नियम पाळून, क्लासेसही सुरू करण्याचा निर्णय जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यात प्रत्येक क्लास संचालक व क्लासमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांनी कोविड टेस्ट करणे, कमी विद्यार्थी संख्येने क्लासेस घेणे, एका बेंचवर एक विद्यार्थी, मास्क व सॅनिटायझरचा वापर आदी गोष्टींचा वापर करणे यासंबंधी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली.
कोरोनासंबधी सरकारने काढलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून, मर्यादित विद्यार्थी संख्येने सर्वांनी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय कोचिंग क्लासेस संचालकांच्या संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी सर्वानुमते घेतला आहे. या बैठकीत संघटनेच्या रिक्त झालेल्या विविध पदांवर सर्वानुमते नियुक्त्या करण्यात आल्या असून, उपाध्यक्षपदी अशोक देशपांडे, कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, कार्याध्यक्षपदी रामकृष्ण घायाळ, सहकार्याध्यक्षपदी श्री राज पवार, कार्यवाहपदी प्रीतीश कुलकर्णी, राज्यप्रतिनिधी रवींद्र पाटील, गणेश कोतकर, संघटक धनंजय शिंदे, महिला उपविभागप्रमुख सुनिता बावणे यांच्यासह विभागप्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब नरुटे, मुकुंद रनाळकर, अरुण कुशारे, विवेक भोर, अतुल आचलिया, लोकेश पारख आदी पदाधिकारी उपस्थित होते.