अझहर शेख, नाशिक: लेझीम नृत्य...संबळवादन अन् टाळकरींसह ढोल-ताशांच्या गजरात एक दोन नव्हे तर तब्बल १२ जावई मुलींना सजविलेल्या सहा बैलगाड्यांमधून मिरवत अनोख्या पद्धतीने धोंड्याचा महिन्याचे औचित्य साधत हिरण कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी पारंपरिक पर्वाचा मराठमोळा आनंद लुटला.
‘मुलीचा मान व जावयाला वाण...’ अशा या धोंड्याच्या महिन्याच्या (अधिकमास) निमित्ताने शहरातील बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पध्दतीने मराठमोळया थाटात अन् मोठ्या उत्साहात हिरण कुटुंबातील लहान-मोठ्या जावई मुलींना मान देत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यासाठी सजविलेल्या बैलगाड्या गावातून मागविल्या. रविवारी (दि.१३) सकाळी दहा वाजता श्री.श्री.रविशंकर मार्गावरील क्षत्रिय समाजाच्या श्री सहस्त्रार्जुन भवनापासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी जावई-मुलींचे औंक्षण करण्यात आले व जावयाला गांधी टोपी-उपरणे देण्यात आले. सजविलेल्या बैलगाडीत ठेवलेल्या खुर्च्यांवर दाम्पत्य विराजमान झाले अन् कुटुंबातील अन्य महिलांसह युवतींनी जोरदार फेर धरला. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलीसह आठ बहिणी, तीन आत्या व आत्याच्या पाच मुली व एक भाची १३ बहिणी अशा तीन पिढ्यांचे हिरण कुटुंबियांचे सर्व सदस्य या मिरवणूकीत सहभागी झाले होते. या सोहळ्यात जेवण हे पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. मिरवणूकीचा समारोप हिरण यांच्या शुभ-भाग्य बंगल्याजवळ करण्यात आला. या बंगल्यात गावाचा अनुभव यावा, यासाठी छोटेखानी तसे गाव थाटण्यात आले होते. मिरवणूकीची सांगता हिरण यांच्या याच रस्त्यावरील शुभ-भाग्य बंगल्याजवळ करण्यात आली. या बंगल्यात गावाचा अनुभव यावा, यासाठी छोटेखानी तसे गाव थाटण्यात आले होते.
मिरवणूकीसाठी ‘ड्रेस कोड’
जावई-मुलींच्या मिरवणूकीसाठी हिरण कुटुंबियांनी ‘ड्रेस कोड’ निश्चित केलेला होता. धोतर, कुर्ता व टोपी अशा वेशभूषेत जावई तर मुलींनी नववारीचा शृंगार करून अस्सल मऱ्हाठमोळा पोशाख परिधान केला होता. मिरवणूकीदरम्यान हलक्या सरींचा वर्षाव सुरू झाल्याने सर्व जावई, मुलींना रंगीबेरंगी एकसारख्या छत्र्या देण्यात आल्या. यामुळे मिरवणूकीची शोभा अधिकच वाढली.