नाशिक : हृदयाचे ठोके वाढविणारे संगीत त्यावर रॅम्पवॉक, स्पर्धकांनी केलेले सादरीकरण आणि सोबतीला लघुपटांचे सादरीकरण अशा अनोख्या मेळ्यात नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा रविवारी (दि. २६) मोठ्या दिमाखात समारोप झाला. नवव्या नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेअर फेस्टिव्हलचा ‘मिस नाशिक-२०१७’ चा किताब आदिती थोरात, तर ‘मिस्टर नाशिक २०१७’चा किताब निहाल शेख यांनी पटकावला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (निफ) अंतर्गत विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘मिस नाशिक-२०१७’ चा क्राउन आदिती थोरात यांनी पटकावला, तर दर्र्पणा मिस्त्री आणि ऐश्वर्या गायकवाड या अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय रनर अप ठरल्या, तसेच ‘मिसेस निफ-२०१७’चा क्राउन रूपाली देवरे यांनी पटकावला तर कल्याणी होळकर आणि गायत्री जगताप या अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय रनर अप ठरल्या आणि ‘मिस्टर निफ २०१७’चा किताब निहाल शेख याने पटकावला, तर हनी पटेल आणि ऋ त्विक तिडके हे अनुक्रमे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय रनर अप ठरले. गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात रंगारंग सोहळ्यात निफ फेस्टिव्हलची उत्साहात सांगता झाली. विविध फेऱ्यांमधून रंगत गेलेल्या फॅशन शोच्या अंतिम फेरीत सहभागी स्पर्धकांनी कल्पकतेने केलेले सादरीकरण आणि सगळ्याच फेऱ्यांमध्ये दाखविलेली चुणूक यामुळे अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या स्पर्धेत अखेरपर्यंत निकासाठी चुरस बघायला मिळाली. निफ फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी फॅशन शोची अंतिम फेरीसह विविध लघुपटांचे सादरीकरण तर काही चित्रपटांचेही प्रोमोही दाखविण्यात आले. रंगारंग सोहळ्याचा थरार आणि सोबतीला चित्रपटातील गाण्याच्या जल्लोषात प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या निफ फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या पाक कला स्पर्धेअंतर्गत ज्योती महतानी यांनी ‘मास्टर शेफ’ हा किताब पटकावला, तर स्नेहा वाणी आणि राधिका कापडणे यांनी अनुक्रमे द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. निफ फेस्टिव्हल अंतर्गत नमिता कोहोक, आयोजक मुकेश कणेरी यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी अनिकेत चव्हाण, शिल्पा शर्मा, मेघा घाडगे आदिंनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून प्रेक्षकांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)या चित्रपटांच्या प्रोमोंचे सादरीकरणनाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी ‘फडकरी’ या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेला, ‘फिरंगी’ हा आदिवासी समाज जीवनावर आधारित तर ‘बेडूक’ या शिक्षण क्षेत्रावर आधारित फिल्मसह विविध चित्रपटांच्या प्रोमोंचे सादरीकरण करण्यात आले तसेच या चित्रपटातील कलाकार आणि लेखक - दिग्दर्शकांनी आपल्या मनोगतातून चित्रपट उलगडून सांगितला.
आदिती थोरात ठरली ‘मिस नाशिक निफ-२०१७’
By admin | Published: March 27, 2017 12:39 AM