लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दीड महिन्यापूर्वी राज्याच्या आगामी मुख्यमंत्रिपदाची राजकीय वर्तुळात चर्चा झडत असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने भाजपाच्या कार्यालयासमोर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टरबाजी केल्याने युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय तणाव निर्माण झालेला असताना आता पुन्हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील काही मित्रमंडळांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फलक लावले आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीसाठी सेना व भाजपाकडून इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या जात असतानाच ही पोस्टरबाजी झाल्यामुळे राजकारण तापले आहे.
आगामी निवडणूक भाजप-सेना युती करून लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते जाहीरपणे सांगत असले तरी, आतून दोन्ही पक्षांत एकमेकांचे विविध कारणांवरून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न गमावला जात नाही. दीड महिन्यापूर्वी भाजपाच्या राज्याच्या प्रभारी सरोज पांडे यांनी राज्याचा भावी मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे विधान केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. सिडकोतील सेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी पांडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयासमोर, महापालिकेत भाजपाची सत्ता असल्यामुळे महापालिकेसमोर ‘महाराष्टÑाचे आगामी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे’ असे फलक लावले होते. या फलकांची शहरात जोरदार चर्चा झडली होती. खुद्द भाजपाने या सा-या प्रकाराबाबत मौन पाळले होते. तर सेनेनेदेखील नगरसेवकाचे कृत्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे पाठराखणच केली होती. आता पुन्हा बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असताना शिवसेना, युवा सेना संचलित श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने गणेश मंडळाच्या मंडपावर आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्राखाली ‘भावी मुख्यमंत्री, युवा हृदयसम्राट’ म्हणून उल्लेख केलेले फलक लावले आहेत. सदरचे फलक शहरातील मध्यवर्ती दर्शनी भागात लावण्यात आल्याने येणा-या-जाणा-यांसाठी तो चर्चेचा विषय ठरला आहे. या फलक बाजीवर दोन्ही पक्षांकडून सोयीस्कर मौन पाळण्यात आले असून, फलक लावणा-या मंडळाने मात्र त्याचे समर्थन केले आहे.