एस. बी. कमानकर, सायखेडा ( नाशिक): दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असतांना सरकार कोणतेही उपाययोजना करत नाही, पीक विमा कंपनीने पिके वाया जाऊनही अजून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देत नाही, सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही तर कोणतेही पीक हातात येत नाही हे प्रशासनाला माहिती आहे. आज अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे.पीक पंचनामे अजूनही सुरु नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. या सरकारला शेतकऱ्याबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थितीची पहाणी करतांना व शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना दिले.
यावेळी माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अध्यक्ष विक्रम रंधवे, तालुका अध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे भाऊसाहेब कमानकर,शरद खालकर, खंडू बोडके, शरद कुटे, अशपाक शेख दिलीप कदम रामदास खालकर, श्याम खालकर यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
निफाड तालुक्यातील अनेक गावात जून महिन्यानंतर पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यानी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहे, विकत पाणी घेऊन पिकवलेली टमाटे भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मात्र शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलतांना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पहाणी दौरा केला. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील भेंडाळी परिसरात मोठा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टमाटे आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसा अभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पहाणी ठाकरे यांनी केली.