आदित्य ठाकरेंचा दौरा आणि शिवसेनेचा विकासात्मक चेहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 12:29 AM2022-01-30T00:29:54+5:302022-01-30T00:35:10+5:30
शिवसेनेचे युवा नेते व राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मुक्कामी नाशिक दौरा हा केवळ शासकीय दौरा नव्हता, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन केलेला नियोजनपूर्वक दौरा होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने घेतलेली वैयक्तिक दखल आणि त्यानंतर केलेल्या उपाययोजना असो किंवा उड्डाणपुलामुळे हेरिटेज वटवृक्षावर येणारे गंडातर टाळण्यासाठी घेतलेला पुढाकार, प्रत्यक्ष केलेली पाहणी, नाशिकच्या पर्यावरणीय बदलाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही ही शिवसेनेच्या नव्या कार्यपद्धतीची प्रचिती होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुका या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या न घेता सेना स्वबळावर लढवू शकते, असा संदेश त्यांनी मित्रपक्षांना यातून दिला आहे. बाळासाहेब, उद्धव, राज, अमित आणि आता आदित्य ठाकरे या ठाकरे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीला नाशिकचे आकर्षण आहे, तसे नाशिककरांनादेखील ठाकरे कुटुंबीयांविषयी प्रेम, जिव्हाळा आहे, हे दौऱ्यात दिसून आले.
शिवसेनेचे युवा नेते व राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मुक्कामी नाशिक दौरा हा केवळ शासकीय दौरा नव्हता, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन केलेला नियोजनपूर्वक दौरा होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने घेतलेली वैयक्तिक दखल आणि त्यानंतर केलेल्या उपाययोजना असो किंवा उड्डाणपुलामुळे हेरिटेज वटवृक्षावर येणारे गंडातर टाळण्यासाठी घेतलेला पुढाकार, प्रत्यक्ष केलेली पाहणी, नाशिकच्या पर्यावरणीय बदलाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही ही शिवसेनेच्या नव्या कार्यपद्धतीची प्रचिती होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुका या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या न घेता सेना स्वबळावर लढवू शकते, असा संदेश त्यांनी मित्रपक्षांना यातून दिला आहे. बाळासाहेब, उद्धव, राज, अमित आणि आता आदित्य ठाकरे या ठाकरे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीला नाशिकचे आकर्षण आहे, तसे नाशिककरांनादेखील ठाकरे कुटुंबीयांविषयी प्रेम, जिव्हाळा आहे, हे दौऱ्यात दिसून आले.
भाजपने गमावले, सेनेने कमावले
जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाचा विषय काही वर्षांपासून गाजतो आहे. भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विकासासोबतच राजकारण आणि अर्थकारण यादृष्टीने उड्डाणपुलाला महत्त्व आले आहे. कधी सिमेंटचा दर्जा तर कधी वृक्षतोड असा विषय घेऊन उड्डाणपुलाचा विषय ऐरणीवर येतो. महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही उड्डाणपूल व हेरिटेज वटवृक्षाविषयी महापौर, स्थायी समितीचे सभापती, शहराध्यक्ष, आमदार या कोणाचीही भूमिका समोर आली नाही. याउलट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: दखल घेतली, प्रत्यक्ष पाहणी केली आणि हा विषय मार्गी लावला. राजकीय कुजबुजीत कोणाचे हितसंबंध आहेत, हे चर्चेत असतानाही याविषयात भाजपाने गमावले आणि सेनेने कमावले, असेच म्हणावे लागेल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेशी निगडित प्रश्नांवर बैठक घेऊन शिवसेनेने नाशिकच्या विकासाविषयी तळमळ आणि कळकळ असल्याचे दाखवून दिले.
आदिवासींचा पाणी प्रश्न, सेनेचे समाजकारण
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आल्यानंतर त्यांनी सेनेचा चेहरामोहरा, स्वभाव व प्रकृती बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालविला आहे. ह्यमी मुंबईकरह्ण ही मुंबईतील मोहीम केवळ मराठी लोकांसाठी असलेली शिवसेना हा शिक्का पुसण्यात बऱ्यापैकी साहाय्यभूत ठरली. मुंबई महापालिकेवरील मांड सेनेने अजूनही सैल होऊ दिली नाही, त्याचे हेच कारण आहे. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण ही भूमिका सेना मांडत असते आणि नेते व सैनिक त्याचा प्रत्यय अनेकदा आणून देतात. शेंद्रीपाड्यातील महिलांना लाकडी बल्लीवरून जाऊन पाणी आणावे लागते, हे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होताच, आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेतली. युवा सेनेच्या माध्यमातून चार दिवसात तेथे लोखंडी पूल उभारला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आणि आदिवासी बांधवांच्या सहभागाने बैठक घेऊन जून अखेरपर्यंत नळाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.
ठाकरे स्मृतीउद्यान, पुतण्याची काकावर मात
राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा उपयोग करीत असत. सेनेने त्याला आक्षेप घेतला. पण तरीही राज यांनी नाशिकमध्ये बाळासाहेबांच्या नावे शस्त्रसंग्रहालय उभारले. महापालिकेत मनसेची सत्ता असताना हे संग्रहालय साकारले गेले. पुढे मनसेची सत्ता गेली आणि संग्रहालय दुर्लक्षित झाले. आता तर त्याचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्याच परिसरात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या पुढाकारातून अभिनव असे स्मृती उद्यान उभारले जात आहे. त्याचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांनी केले. मुक्कामी दौऱ्यात हा एकमेव पक्षीय कार्यक्रम घेऊन ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांच्यावर मात केली आहे. राज ठाकरे हे अधूनमधून नाशिकला येऊन मनसेत प्राण फुंकण्याचे प्रयत्न करीत असले तरी सेना मूळ सैनिकांची घरवापसीसह भूमिपूजनासारखे धक्के देत आहेच.
आदित्य अन् अमितचा रंगणार सामना
नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेत असल्यापासून नाशिकची धुरा सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क, नेते व कार्यकर्त्यांशी संबंध चांगले आहेत. २०१२ मध्ये मनसेला महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत याचा फायदा झाला. अनेक शिवसैनिक मनसेच्या इंजिनावर स्वार झाले. पुढे सत्ता जाताच मनसेतील कार्यकर्ते सैरभैर झाले. काही भाजपमध्ये गेले, तर काहींची घरवापसी झाली. तरीही राज ठाकरे चिकाटीने नाशिकवर लक्ष केंद्रित करून आहेत. अलीकडे त्यांनी पुत्र अमित यांना नाशिकला पाठवले. दोनदा अमित ठाकरे आले आणि त्यांनी विभागप्रमुखांच्या मुलाखती देखील घेतल्या. गोल्फक्लबवर स्थानिक खेळाडूंसोबत फुटबॉल खेळून ठाकरे कुटुंबीयांमधील वेगळेपणाचा परिचय करून दिला. आता आदित्य ठाकरे यांनी केवळ आणि केवळ महापालिकेशी निगडित विषयांवर दिवसभर बैठका, पाहणी केली. याचा अर्थ या निवडणुकीत आदित्य आणि अमित या ठाकरे कुटुंबांतील युवा नेत्यांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला सेनेचा मजबूत संदेश
दोन्ही काँग्रेस या राज्यपातळीवर शिवसेनेला फारसे महत्त्व देत नाही, अशी सेनेची तक्रार आहे. नगरपंचायत निवडणुकीतही सेना चौथ्या क्रमांकावर राहिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी या विषयावर मनमोकळेपणाने सैनिकांशी संवाद साधला. पुढील प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढविली जाईल, असा संदेश त्यांनी दिला. आदित्य ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींच्या पाणीप्रश्नात घातलेले लक्ष, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी केलेले प्रयत्न पाहता स्थानिक काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांना हा इशारा आहे. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या नियोजित प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चालविलेले प्रयत्न हे देखील महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहे. संजय राऊत यांच्यापाठोपाठ आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या प्रश्नांमधील सक्रियता पाहता दोन्ही काँग्रेसला हा धक्का आहे.