नाशिक- शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला शुक्रवारपासून भिवंडीमधून सुरुवात झाली. यावेळी, राजकीय सत्तानाट्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आदित्य यांच्या स्वागताला दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेच उपस्थित होते. त्यानंतर, आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आदित्य यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. नाशिकच्या मनमाड येथूनही आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच, हे सरकार गद्दारांचं सरकार असल्याचंही ते म्हणाले.
आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. भाषण करताना आदित्य ठाकरेंनीएकनाथ शिंदेंसह इतरही बंडखोर आमदारांना सातत्याने गद्दार म्हणायला सुरुवात केली आहे. ठाण्यानंतर आज नाशिकमध्येही त्यांनी आमदारांचा आणि शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असून एकदिवस कोसळणार म्हणजे नक्कीच कोसळणार, असेही आदित्य यांनी म्हटले.
बंडखोर आमदार सुहास कांदेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, गद्दारांनी पहिले उत्तर द्यावं की त्यांनी गद्दारी का केली? असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, गद्दारी का केली हे कळलेच नाही. हे सरकार थोड्याच दिवसात कोसळणार, हे गद्दारांचे सरकार असून नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी आपल्या भाषणातून केला. तसेच, गद्दारांनी शिवसैनिकांचा आवाज ऐकावा, जो आवाज मतदानाच्या पेटीतून दिसून येईल, असेही ते म्हणाले.
भिवंडीतूनही एल्गार, सरकार कोसळणार
"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? असे म्हणत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून बंडखोरांवर हल्लाबोल केला. यावेळी, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकीतही त्यांनी केलं होतं.