निफाड : तालुक्यातील बेहेड येथून रेशनचे धान्य नेणारे संशयित आणि त्यांना पाठीशी घालणारे पुरवठा अधिकारी , रेशन धान्य दुकानदार या सर्वांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी बेहेड येथील आदिवासी महिलांनी निफाड तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन दिले. एक महिन्यांपूर्वी बेहेड येथील महिलांनी रेशनचा तांदूळ बेहेड येथून रात्रीच्या सुमारास अल्टो वाहनातून काळ्या बाजारात नेत असताना रंगेहात पकडून पिंपळगाव बसवंत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आदिवासी महिलांचे आंदोलन वाढत चालल्याने व या प्रकरणाची चर्चा झाल्याने सदर वाहन संशयितांनी स्वत:हून पिंपळगाव पोलीस ठाण्यात जमा केले होते. मात्र संशयितावर गुन्हा दाखल होत नसल्याने या सर्व बाबींना त्रासून बेहेडच्या शेकडो महिलांनी शुक्रवारी निफाड तहसीलवर मोर्चा काढला. धान्य घोटाळ्यात सहभागी असलेल्या पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार यांच्यावर गुन्हे दाखल करा, या सर्व गोष्टींची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा, आमच्या हक्काचे रेशन द्या व इतर मागण्यांचे फलक हातात घेऊन या महिलांनी निफाड येथे कॉलेज रोडपासून मोर्चाला सुरुवात केली. महिलांच्या हातात विविध फलक होते. मोर्चात मीराबाई भवर, मंदा गायकवाड, विजाबाई दिवे, कुसुम दिवे, मनीषा वाघ, सुमन मागाडे, भाग्यश्री दिवे, ताराबाई शितान, दगूबाई कराटे, सविता कडाळे, मंगल कडाळे, कविता भवर, शांताबाई शिंगाडे, सविता फसाळे, ताराबाई फसाळे आदींसह शेकडो महिला व नागरिक सहभागी झाल्या होत्या.
आदिवासी महिलांचा निफाड तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:57 AM