सटाणा : राज्य सरकारने गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये व दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइंने केली आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २०) तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना मागणीचे निवेदन सादर केले.महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जात असल्याचे निवेदनात नमूद करून ९० लाख लिटर दूध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहकांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते. यावेळी संजय देवरे, महेंद्र अहिरे, डोंगर पगार, राहुल सोनवणे, बापुराज खरे, मनोज सोनवणे, रमेश व्यापार, योगेश सिसोदे, राकेश घोडे, युवराज पगार, संतोष पगार, रूपाली पंडित, रेणुका शर्मा, दिलीप खैरनार आदी उपस्थित होते.कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दूध विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून १५ ते १६ रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र ७ लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे.