नाशिक : कोरोना नियंत्रणात येत असताना नागरिकांनीदेखील संयम दाखविणे अपेक्षित असल्याचे राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही सलग सुट्यांमुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने प्रशासनही चिंतेत आहे. इतर शहरातील अनेक पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाल्याने कोरोनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता दाखविणे अपेक्षित असताना लोक घराबोहर पडल्यामुळे गर्दी आणि उत्सवावर नियंत्रण असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. शहरात येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगांमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली असल्याचे दिसते. याचा थेट परिणाम प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणेवर होणार असून नाशिककरांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट किती मोठी असेल याबाबतची शाश्वती काहीच देता येत नसली तरी पहिल्यापेक्षा दीडपट अधिक लाट आली तरी प्रशासन त्याचा सामना करू शकेल, अशी तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. मात्र नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे. सध्या अडीचशे ते तीनशे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. दाखल रुग्णांच्या संख्येत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने अजूनही दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची भीती बऱ्यापैकी कमी झालेली आहे; परंतु संकट मात्र टळलेले नाही. अशा परिस्थितीत शहरात वाढलेली गर्दी प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. नागरिकांनी उगाच घराबाहेर पडू नये, सुरक्षितता नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सामाजिक संकट म्हणून प्रत्येकाने जबाबदारी ओळखावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले होते. मात्र सलग सुट्यांमुळे वाढलेल्या गर्दीने प्रशासनाची धावपळ वाढण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी केारोनाशी लढत आहे. अशावेळी नागरिकांची साथदेखील महत्त्वाची असल्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, हात स्वच्छ करण्यात यावे, सार्वजिनक ठिकाणी गर्दी करू नये असे वारंवार आवाहन करण्यात येते, मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा नेहमीच समोर येतो. सलग आलेल्या सुट्यांमुळेदेखील हेच चित्र दिसत आहे.