सिडको : ऐन सणासुदीच्या दिवसातही आठ-आठ दिवस घंटागाडी प्रभागात फिरत नसून नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहत आहे. घंटागाडी मक्तेदारास मागील प्रभागसभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसून केवळ नोटिसा देत आहे. या प्रकरणात मनपा अधिकारी व घंटागाडी मक्तेदार यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड होत असल्याचा आरोप सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१२) नगरसेवकांनी केला.सिडको प्रभागात मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अजूनही मुरूम टाकून खड्डे बुजविले जात असल्याने या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. सिडको प्रभाग समितीची सभा प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१२) पार पडली. संपूर्ण सिडको प्रभागात साथीच्या आजारातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही मनपाचा संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी केला. सिडको प्रभागात आठ-आठ दिवस घंटागाडी फिरत नसून संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मक्तेदाराला पाठीशी घालत असून, यात अधिकारी व मक्तेदार यांच्यात आर्थिक तडजोड होत असल्याचा आरोप प्रविण तिदमे यांनी केला. या चर्चेत नगरसेवक श्यामकुमार साबळे, प्रतिभा पवार, छाया देवांग, पुष्पा आव्हाड यांनीही अशाच तक्रारी केल्या. नगरसेवक सुदाम डेमसे यांनी मागील प्रभागसभेत मांडलेला हॉटेलच्या अतिक्रमणाचा विषय याही प्रभागसभेत उपस्थित केला. दीपक दातीर यांनी प्रभागातील रस्ते कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, यात अधिकारी सामील असल्याचा आरोपही दातीर यांनी केला. यावेळी किरण गामणे यांनी मोरवाडी येथील अपूर्ण कामांबाबत तक्रार केली.दूषित पाण्याचा प्रश्न कायमनीलेश ठाकरे यांनी प्रभागात मिनी घंटागाडीची मागणी करूनही ती अद्याप देण्यात आली नसल्याची तक्रार केली. छाया देवांंग यांनी सांगितले करी प्रभागात अनियमित घंटागाडी फिरत असून गढूळ व दूषित पाण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नसल्याचे सांगितले. प्रतिभा पवार यांनी बहुतांशी पथदीप बंद असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिले. सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे यांनीही चर्चेत भाग घेतला.
अनियमित घंटागाडीमागे प्रशासनाचे साटेलोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:58 PM
ऐन सणासुदीच्या दिवसातही आठ-आठ दिवस घंटागाडी प्रभागात फिरत नसून नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहत आहे. घंटागाडी मक्तेदारास मागील प्रभागसभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसून केवळ नोटिसा देत आहे. या प्रकरणात मनपा अधिकारी व घंटागाडी मक्तेदार यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड होत असल्याचा आरोप सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१२) नगरसेवकांनी केला.
ठळक मुद्देसिडको प्रभाग समिती : खड्ड्यांमुळेही नगरसेवक संतप्त