नाशिक : जायकवाडीसाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळताना फक्त पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्णातील धरणांमधून यापुढे कमी पाणी सोडावे लागण्याची आशा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नाशिक जिल्ह्णातील गंगापूर व गिरणा खोऱ्यातून ४.३६ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने त्याविरोधात सर्वपक्षीय विरोध करण्यात आला, तर नगरच्या पाण्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेची शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका फेटाळल्या परंतु जायकवाडीसाठी फक्त पिण्यासाठी पाणी सोडा, असे आदेश दिले आहेत. यापूर्वी जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे पाणी पिण्यासाठी व सिंचन तसेच उद्योगासाठी सोडण्यात येणार होते, आता न्यायालयाने फक्त पिण्यासाठीच पाणी सोडा असे सांगितल्यामुळे जायकवाडी धरणात पिण्यासाठी किती पाणी लागेल याचा आढावा घेतला जाईल व तितकेच पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील धरणातून कमी पाणी सोडावे लागेल अशी आशा आहे; मात्र अद्याप न्यायालयाचा निकाल हाती न लागल्यामुळे किती पाणी सोडायचे याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.
प्रशासनाला पाणी कपातीची आशा
By admin | Published: October 31, 2015 12:15 AM