येवला : येथील औद्योगिक सहकारी वसाहतीत १३ संचालकांच्या अंतर्गत बेबनावामुळे काही संचालकांनी सहायक निबंधक सहकारी संस्था येवला यांच्याकडे दाखल केलेल्या तक्र ारीची चौकशी होऊन या संस्थेवर नवीन व्यवस्थापक समिती पदग्रहण करेपर्यंत संस्थेच्या कामकाजासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश येवला सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येवला औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. अंगणगाव या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अल्पमतात आल्याने त्यांचे कामकाज थांबविण्यात यावे, अशा आशयाची तक्र ार ९ संचालकांनी येवला सहायक निबंधक व सहनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दाखल केली होती. येवला सहायक निबंधकांनी या प्रकरणी चौकशी अहवाल मागविला होता. या चौकशी अहवालात संस्थेच्या संचालक मंडळाच्या वेळोवेळी होणाºया सभांचा कोरम पूर्ण झालेला नाही. कोरमअभावी संस्थेचे कामकाज ठप्प झाले होते, संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात काही संचालक गैरहजर असल्याचे आढळून आले होते. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या संचालकांना संस्थेविषयी व सभासदांविषयी आस्था नसल्याचे निदर्शनास येत असून, सहकार नियमाप्रमाणे संस्थेवर प्राधिकृत अधिकारी नेमणे अपरीहार्य असल्याचे म्हटले आहे. येवला औद्योगिक सहकारी वसाहतीवर नवीन संचालक मंडळ येईपर्यत संस्थेवर प्रशासक म्हणून सहकार अधिकारी डी.व्ही. पाटील यांची नेमणूक करण्यात आल्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था येवला यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. याबाबत संस्थेच्या १३ संचालकांसह संबधितांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
औद्योगिक वसाहतीवर प्रशासकाची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:47 AM