संदीप भालेराव/लोकमत
नाशिक : तोट्यात असलेल्या जिल्हा बँकेला ‘नाबार्ड’ने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याबाबतची अंतिम नोटीस बजावल्याने जिल्हा बँक वाचविण्यासाठी प्रशासकांची धावाधाव सुरू झाली आहे. बँकेला वाचविण्यासाठी पर्याप्त भागभांडवल वाढविणे गरजेचे असल्याने आता सक्तीच्या कर्ज वसुलीसाठी बँकेला ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा लागणार आहे.
नााशिक जिल्हा सहकारी बँकेची दिवसेंदिवस खालावणारी आर्थिक स्थिती बँकेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरत असल्याचे ‘नाबार्ड’च्या पत्रामुळे समोर आले आहे. एकेकाळी जिल्हा बँकेचा पत आराखडा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. परंतु, मधल्या काही काळात या बँकेची परिस्थिती बिघडली. सद्यस्थितीत बँक ९०९ कोटी एवढ्या मोठ्या तोट्यात आहे. बँकेला ‘नाबार्ड’ने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याबाबतची अंतिम नोटीस पाठविली असल्याने आता कर्जवसुलीचा वेग बँकेला वाढवावा लागणार असल्याने बड्या कर्जदारांवर बँकेकडून लक्ष केंद्रीत केले जाण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनपीए वाढत गेल्याने ‘नाबार्ड’ने गेल्या १४ ऑगस्ट रोजी बँकेला परवाना रद्द का करण्यात येऊ नये, असे पत्र पाठविल्याने बँक प्रशासकांची धावपळ सुरू झाली. जिल्हा बँकेवर सध्या प्रशासक असून, कर्ज वसुलीसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरूच आहे. यासाठी त्यांनी कर्जदारांच्या सातबारावरदेखील बोजा लावण्याची कारवाई केली असून, वसुलीसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. पथकाकडून तालुकानिहाय वसुलीची कार्यवाही सुरू आहे. मात्र, तरीही एनपीए कमी होत नसल्याचे ‘नाबार्ड’ने बँकेला नोटीस पाठविल्याने परवाना रद्द हेाण्याची नामुष्की आली आहे.
जिल्हा बँकेवर ओढवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली.