नाशिक :नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालाजवळ आडगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सत्तर बेडचे कोविड केअर सेंटरचे उदघाटन आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आखली होती. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.दिघावकर यांनी उदघाटन केल्या नंतर त्या स्थळी पाहणी केली.यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या कोविड सेंटर मध्ये एकूण 70 बेड असून ते सर्व ऑक्सिजन बेड आहेत.यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात राहणार असून तीन डॉक्टर यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे पीजेडपी पॅटर्न नाशिकला पहिल्यांदाच बघायला मिळाले असल्याचे प्रतिपादन डॉ.दिघावकर यांनी केले.
दरम्यान, ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ कोविड सेंटर साकारताना जिल्हा परिषदेची मोठी मदत झाली.याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागेल. सुविधा व उपचार बाबतीत विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटीलयांनी सांगितले.