नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लहवित, सय्यदपिंप्री, अंजनेरी, पळसन, करंजाळी, चिंचओहळ, दळवट व उंबरगव्हान या आरोग्य संस्थांना १०२ क्रमांकाच्या फोर्स कंपनीच्या बी टाइप रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेसाठी प्राप्त रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा कोरोना नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद आवारात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते वाहन चालकांच्या हाती रुग्णवाहिकांच्या चाव्या व रुग्णवाहिकेचे नोंदणी प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी सदस्य यशवंत ढिकले, विलास बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, प्रकाश थेटे उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा जिल्हा परिषदेने केला होता. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना प्राप्त रुग्णवाहिकांद्वारे चांगली आरोग्य सेवा मिळेल व रुग्णांना जीवदान देणारी आपली सेवा राहील, अशी अपेक्षा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. (फोटो २२ ॲम्बुलेन्स)