नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानीत शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयापी जवळपास पूर्ण झाली आहे.राज्यभरातील विविध शाळांमध्ये १ मे रोजी शाळेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून शाळेचा निकाल जाहिर करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये दोन दिवस अगोदरच विद्यार्थ्यांचे निकालपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने बहूतांशी शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी यावेळी परीक्षा संपल्यानंतर तत्काळ निकाल पत्र तयार करून ठेवले असून जवळपास सर्व शाळांची निकाल प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. प्राथमिक शाळांमध्ये होणाºया सर्व प्रकारच्या चाचण्या व परीक्षा झाली २० एप्रिलपूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहे. आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांकडून शून्य ते ६ व ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.
स्थलांतरीतांना १५ जूननंतर प्रवेशनव्याने शाळेत दाखल होणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असली तरी विविध कारणांनी स्थलांतरीत झाल्यामुळे शाळा बदलावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात १५ जूननंतर प्रवेश दिले जाणार आहे. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्ष ६ मे पर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू राहणार असून पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहे.
डोनेशनमुळे शिक्षणाचा बाजार शैक्षणिक वर्ष २०१८-१९चे दुसरे सत्र संपत आल्याने विविध कारणांनी पाल्याची शाळा बदलू इच्छिणाऱ्या पालकांना नवीन शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देणे कठीण झाले आहे. अनेक शाळांकडून पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २५ हजार ते ५० हजार रुपयांचे डोनेशन मागीतले जाते. त्याचप्रमाणे नर्सरीसह पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या प्रवेशासाठीही पालकांकडून अशाप्रकारे डोनेशनची मागणी होत असल्याचे प्रकार सुरू आहे. परंतु, शिक्षण विभागाचे मात्र या प्रकारकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांकडून शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार सुरू झाला आहे.