रामदास शिंदे : पेठएक वर्षाच्या आतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची पगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व कृषी व बिगरकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये तसेच शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणसंस्थांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.याआधी अनाथालय किंवा अनाथाश्रमांमधून मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ९० दिवसांची विशेष रजा दिली जात होती; परंतु अनाथालयातून किंवा अनाथश्रमांतून मूल दत्तक घेणे आणि स्वत:चे मूल नसणे या दोन्ही अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत. आता दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्याने मूल दत्तक घेतले तरी, तिला विशेष रजेचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारने अलीकडेच मूल दत्तक घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजेप्रमाणे १८० दिवस मुलाच्या संगोपनासाठी विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही तसा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने या संदर्भात सविस्तर माहिती असलेला शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. दत्तक मूल संगोपन विशेष रजेशिवाय, दत्तक मुलाचे वय लक्षात घेऊन असाधारण रजाही देण्यात येणार आहे. त्यानुसार दत्तक मुलाचे वय एक महिन्यापेक्षा कमी असेल तर एक वर्ष, सहा महिने आणि सात महिन्यांपेक्षा कमी असेल तर सहा महिने, दत्तक मुलाचे वय नऊ महिने आणि दहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर तीन महिन्यांची रजा मिळेल. या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी मूल दत्तक घेण्यासंबंधातील कायदेशीर कागदपत्रे, दत्तक संस्थेची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या विशेष रजेसाठी सेवा कालावधीची अट नाही. मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झाली आहे, अशा महिलांनी मूल दत्तक घेऊन विशेष रजेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासनाची दोन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर अशी रजा सवलत घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यास राजीनामा द्यायचा असल्यास किंवा अन्य क्षेत्रात नोकरी करण्यासाठी जायचे असल्यास, त्यांना रजा कालावधीत मिळालेले वेतन शासनास परत करावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही तसेच त्यांना कार्यमुक्त केले जाणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.शासन निर्णयाचा आदेश जारी दत्तक घेण्याच्या दिनांकास मुलाचे वय एक वर्षाच्या आत असेल तर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. एक वर्षापेक्षा जास्त व तीन वर्षांपेक्षा कमी वय असलेले मूल दत्तक घेतल्यास ९० दिवसांच्या रजेचा लाभ मिळेल. आधीच्या निर्णयाप्रमाणे ज्या महिला दत्तक मूल घेतल्याच्या कारणास्तव ९० दिवसांच्या रजेवर आहेत आणि त्या मुलाचे वय एक वर्षाच्या आत असेल तर अशा महिलांनाही आणखी ९० दिवसांची वाढीव विशेष रजा मिळेल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मूल दत्तक घ्या अन् सहा महिने पगारी रजा मिळवा
By admin | Published: March 22, 2017 11:27 PM