विंचूर : अनेक शैक्षणिक संस्थांनी देशामध्ये उत्तम काम केले. त्यात रयत शिक्षण संस्था कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करणारी नवीन पिढी तयार करण्याचे काम करत आहे. आज समाजामध्ये जो बदल झाला त्याला कारणीभूत शिक्षण व्यवस्था असून सध्याचे स्पर्धेचे युग बघता कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विंचूर शुक्रवारी येथे केले.रयत शिक्षण संस्थेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, व्हा. चेअरमन भगिरथ शिंदे, वनाधिपती विनायकदादा पाटील उपस्थित होते.व्यासपीठावर रामशेठ ठाकूर, आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, किशोर दराडे, हेमंत टकले, राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, माजी खासदार समीर भुजबळ, रवींद्र पवार, श्रीराम शेटे ,कोंडाजी आव्हाड, जि.प.उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, संजय बनकर,अमृता पवार, पंढरीनाथ थोरे, काकासाहेब गुंजाळ, जयदत्त होळकर,सरपंच कानडे व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली त्यात कर्मवीर भाऊसाहेब हिरे, वसंतराव नाईक यांनी शिक्षणाचे रोपटे लावले त्याचे आज वटवृक्ष झाला आहे. हे शैक्षणिक जाळे निर्माण होण्यात महात्मा जोतीराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करावे : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 3:45 PM