संजीव धामणे ।नांदगाव : कल्पना चावला, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, मार्गारेट थॅचर, किरण बेदी यांची छायाचित्रे व त्यांची माहिती प्रेरणादायी ठरेल. या अपेक्षेने प्रसूतिगृह सजविण्यात आल्यामुळे नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयाने अन्य रुग्णालयांपुढे वेगळा असा आदर्श उभा केला आहे. शासकीय रुग्णालयसुद्धा प्रेरणादायी असू शकते. या उद्देशाने येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी जगविख्यात प्रसूतीतज्ज्ञ डॉ. पुरंदरे यांचे नाव प्रसूती विभागाला देऊन डॉक्टर्स व परिचारिकांचा आत्मविश्वास वाढवला. केवळ नाव देऊन ते थांबले नाहीत, तर प्रसूतीगृहाचा नकाशाच त्यांनी बदलवून टाकला. शासकीय रुग्णालयात प्रसूती कक्ष म्हणजे एक मोठा हॉल असतो. एका शेजारी एक बेड टाकलेले असतात. सर्व काही उघड्यावर चाललेले असते. लाज वाटली तरी इलाज नसतो. खासगी रुग्णालयासारखे रूममध्ये एक पार्टिशन टाकून दोन भाग बनवून सेमी रूम या हॉलमध्ये तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. त्यासाठी त्यांनी मदतीचे आवाहन केले व दानशूर व सामाजिक संस्थांच्या मदतीने अल्पावधीत हॉलमध्ये छोटे दहा कक्ष तयार झाले. प्रत्येक कक्षाला श्रीकृष्णाची नावे देण्यात आली. राधाप्राण, देवकीनंदन, द्वारकाधीश, राधाधन, माधव, मुरलीधर, आनंदसागर इत्यादी. आता प्रसूत महिलेची ओळख ‘त्या’ कोपºयातील ‘ती’ महिला किंवा क्रमांकाने होत नाही, तर ती कृष्णाच्या नावाने होते. उदा. देवकीनंदन कक्षातील महिला इतर. प्रसूत महिला सुद्धा पटकन सांगतात. मी अमुक अमुक कक्षात आहे. स्वतंत्र व काहीशी प्रायव्हेट जागा मिळाल्याने प्रसूत महिलांच्या मानसिकतेतही बदल व आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयाचा बदललेला बाज समाजमनात ठसू लागला आहे. या प्रसूतीगृहातून बाहेर जाताना अजून एक कक्ष लागतो. डिस्चार्ज देताना मर्यादित कुटुंबाचे फायदे प्रशिक्षित परिचारिका समजावून देतात. त्यामुळे ती महिला वेगळा दृष्टिकोन घेऊन घरी जाते. पुरंदरे वॉर्डातून पुढे निघाले की, डॉ. हिंमतराव बाऊस्कर वॉर्ड हे नाव दिसते. डॉ. बाऊसकर हे विंचू व सर्पदंश यावरील उपायातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाव आहे. डॉ. बोरसे यांनी १०० पेक्षा अधिक सर्पदंशांवर उपचार केले. रात्री केव्हाही बाऊसकर यांनी सर्पदंशा- संदर्भात बोरसे यांचा फोन घेतला नाही असे झाले नाही. याची कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव वॉर्डाला देण्यात आले आहे. बालपणीचा कृष्ण व त्याच्या लीला समाजमनाचा प्रेरणादायी स्त्रोत ठरला आहे. श्रीकृष्णाचे बालपण साहस, बुद्धिमता, शौर्य व चातुर्य यांचा मिलाफ आहे. त्याच्या नावांनी बनविलेले कक्ष प्रसूत महिलांना व त्यांच्या कुटुंबीयाना आनंददायी ठरावेत. भेटायला येणारे बाहेरचा फलक वाचून आत जातील. तेव्हा त्यांच्या मनात महिलेच्या नावाबरोबर श्रीकृष्णाचे नाव असेल. त्याच्या गाथांची आठवण येईल. प्रसूती हॉलला डॉ. पुरंदरे यांचे नाव दिले. कारण डॉ. पुरंदरे प्रसूतीशास्त्रातले एक गणमान्य नाव आहे. त्यांचे नाव देणे हा त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा आहे. - डॉ. रोहन बोरसे , वैद्यकीय अधिक्षक, नांदगाव