नाशिक : सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या एचपीटी महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रावर विशेष संपर्कसत्राचे आयोजन केले होते. यावेळी समन्वयक श्रीकांत सोनवणे आणि अशोक देशपांडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मुळे म्हणाले की, पत्रकारिता करताना सोशल मीडिया त्यास फायदेशीर ठरत आहे. परंतु जोपर्यंत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या मजकुराची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे धाडसाचे होईल. यावेळी डॉ. मुळे यांनी, ‘बातमी’ या अनुषंगाने माहिती देताना म्हटले की, कुठल्याही विषयाची बातमी होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रत्येक बातमीदाराने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन वार्तांकन करण्याची गरज आहे. असे केल्यास त्याचा बातमीदारालाही फायदा होत असून, त्याच्या जनसंपर्कात वाढच होते. शिवाय बातमीचे स्त्रोतही त्याला निर्माण करता येतात. यावेळी डॉ. मुळे यांनी, विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. यात बहुतांश विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाशी निगडीत प्रश्न विचारले असता, त्यांनी सोशल मीडियावर वापर करताना दक्षता घ्यावी असा सूचक सल्ला दिला. कारण सोशल मीडियांच्या जाळ्यात ज्या पद्धतीने सध्याचा तरुण अडकत आहे, त्यावरून त्याचा वापर करताना दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाचे फायदे अन् तोटेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:59 PM