चंद्रकांत सोनार
मालेगाव - जिल्हा सहकारी बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. हिरे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांनी दोन तास युक्तिवाद केला. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने बँकेच्या वकिलाची बाजू ऐकून घेतल्यावर जामीन अर्ज फेटाळला आहे.
नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पोलिस व नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिरे यांना जामीन मिळावा, यासाठी सोमवारी हिरे यांचे वकील असिम सरोदे यांनी युक्तिवाद केला. मंगळवारी न्यायालयात जिल्हा बॅकेचे वकील ए. वाय. वासिफ यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, अद्वय हिरे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात एमपीआरडी कायदा चुकीच्या पध्दतीने लावण्यात आल्याचा युक्तीवाद केला गेला. मात्र ॲड.वासिफ यांनीसहकारी बॅक व सोसायटी यांना एमपीआरडी कायदा लागू होत असल्याचा पुरावे न्यायालयात सादर केले. तसेच जिल्हा बॅकेत ३२ कोटी ४० लाखांचा अपहार झाल्याने ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नसल्याचे पटवून दिले. यानंतर न्यायालयाने हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला.