नाशिक : संपूर्ण विश्वाला वर्षभर वेठीस धरलेल्या कोरोना आजारावरील प्रतिबंधात्मक लस बुधवारी (दि. १३) पहाटे नाशिक जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली. जिल्हा रुग्णालयातील वॉक इन कुलरमध्ये २ ते ८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात या लसी ठेवण्यात आल्या आहेत. दुपारपर्यंत ही लस उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मोठ्या व्हॅनद्वारे वितरित करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.१२) मध्यरात्री कोविडची ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लस निघून नाशिक जिल्हा रुग्णालयात पहाटे दाखल झाली. उत्तर महाराष्ट्रासाठी १ लाख ३२ हजार लसींचा स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४०, नगर जिल्ह्यासाठी ३९ हजार २९०, जळगाव जिल्ह्यासाठी २४ हजार ३२० तर धुळे जिल्ह्यासाठी १२ हजार ४३० तर नंदुरबार जिल्ह्यासाठी १२ हजार ४१० लस प्राप्त झाल्या आहेत. त्यातील नगरच्या लसी पुण्याहून येताना रात्रीच हस्तांतरित करण्यात आल्या. सकाळपासून प्रारंभी जळगाव, त्यानंतर नंदुरबार आणि त्यानंतर लगेच धुळ्याच्या व्हॅन दाखल झाल्यावर त्यांच्या निर्धारित लसींचा स्टॉक त्यांच्या वाहनांमधून सुपुर्द करण्यात आला. या सर्व लसी बुधवारीच आपापल्या जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन तेथील वॉक इन कुलरमध्ये सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत. त्यांनतर, १६ जानेवारीला पहाटे संबंधित जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील रुग्णालयांमध्ये वितरित केल्या जाणार आहेत.
इन्फो
निर्धारित तापमानात साठवणूक
जिल्हा रुग्णालयातील लस साठवणूक दालनातील वॉक इन कुलरमध्ये सुमारे ५ डिग्री सेंटिग्रेडला या लसी मोठ्या बॉक्सेसमध्ये साठवून ठेवण्यात आल्या आहेत. त्या लसींचे तापमान कायमस्वरूपी २ ते ८ डिग्रीपर्यंत ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे व्हॅनमधून नेतानाही त्या लसी आइसलँड रेफ्रीजरेटरमधून (आयएलआर) नेण्यात आल्या.
इन्फो
५ जिल्ह्यात ५० वितरण केंद्रे
लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात केवळ सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, तसेच नोंदणीकृत खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्याला ४३ हजार ४४० लस नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. त्या नाशिकच्या सर्व पंधरा तालुक्यांमध्ये १६ जानेवारीला वितरित करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी ५ जिल्ह्यांत ५० वितरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यासाठी १६, अहमदनगरला १५, जळगाव ९, धुळे आणि नंदुरबारला प्रत्येकी ५, याप्रमाणे वितरण केंद्रे राहणार आहेत.
कोट..
पुरेसा लससाठा प्राप्त
नाशिक जिल्हा रुग्णालयात बुधवारी पहाटे या लस दाखल झाल्या असून, १६ जानेवारीला तालुका स्तरावर लसींचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यासाठी पुरेसा लससाठा प्राप्त झाला असून, शासनाच्या निर्देशानुसार त्यांचे वितरण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी लसीकरण केले जाईल. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळू शकणार आहे.
- पी.डी. गांडाळ, आरोग्य उपसंचालक