नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र हर्षोउल्हासाचे वातावरण, शालेय तसेच महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर कुटुंबासह सार्वजनिक सुटीचा आनंद घेत असलेले नागरिक़ शहरात एकीकडे हे दृश्य असतानाच दुसरीकडे आत्महत्या करायचीच अशी खूणगाठ मनामध्ये बांधून आलेल्या एका वैफल्यग्रस्त पंचवीस वर्षीय युवतीने गंगापूर रोडवरील सुयोजित पुलावरून गोदावरी पात्रात उडी घेतली़ मात्र, याचवेळी कारमधून जाणाºया अश्मंत अविनाश दातरंगे (रा़पंडित कॉलनी) या युवकाच्या लक्षात ही बाब आली अन् त्याने मागचा-पुढचा काही विचार न करता नदीत उडी घेत सदर तरुणीस अक्षरश: गाळातून खेचून पाण्याबाहेर काढले व तिचे प्राण वाचविले़ एकीकडे माणूसकी संवेदनाहीन झाल्याची चर्चा करणाºया समाजात अश्मंत दातरंगे या युवकाने दाखविलेले धाडस मात्र कौतुकाचा विषय बनला आहे. २६ जानेवारीला मिळालेल्या सुटीचा नागरिक आनंद घेत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील गंगापूर रोडवरील सुयोजित पुलावर एक पंचवीस वर्षीय युवती उडी मारण्याच्या तयारीत उभी होती़ याचवेळी कारधून अश्मंत दातरंगे हा युवक शहीद अरुण चित्ते पुलाकडे आपल्या कारने जात होता़ त्याची नजर पुलाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या व उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या या युवतीकडे गेली़ अश्मंतने क्षणाचाही विचार न करता आपल्या कारचे ब्रेक दाबले व कार जागेवर उभी केली, मात्र तोपर्यंत तरुणीने पाण्यात उडी देखील घेतली होती. अश्मंतने कुठलाही विचार न करता या तरुणीपाठोपाठ स्वत:ही पाण्यात उडी घेतली़ विशेष म्हणजे या तरुणीने आत्महत्येची खूणगाठ इतकी मनाशी बांधलेली होती की तिने जगण्यासाठी धडपड वा ‘वाचवा-वाचवा’ अशी कोणास साद देखील घातली नाही़ या तरुणीचे पाय गाळात अडकले व केवळ तिचे हातच वर दिसत होते़ तर तिच्यापाठोपाठ पुलावरून उडी घेतलेल्या अश्मंतचे पायही गाळात अडकले होते, मात्र यातून स्वत:ची सुटका करून घेत आपल्यापासून साधारणत: चार मीटरवर असलेल्या या तरुणीपर्यंत पोहोचत जाऊन तिला पूर्ण ताकदीनिशी बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला़ मात्र ही तरुणी त्यालाच मध्ये खेचत होती़ अखेर, अश्मंत याने आपली संपूर्ण ताकद लावून तरुणीला खेचत नदीच्या किनाºयापर्यंत आणले़ तरीही सदर तरुणी ‘सोडा़़़सोडा़़़मला़़़मरूद्या’ असे ओरडत होती़ यावेळी पुलावर झालेल्या बघ्यांच्या गर्दीतील नागरिक खाली उतरले व त्यांनी या युवतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ विशेष म्हणजे यावेळी जमलेल्या नागरिकांपैकी काहींनी अश्मंत व आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाºया तरुणीचा फोटो काढायचा प्रयत्न केला असता अश्मंतने समजूतदारपणा दाखवित युवतीचे फोटो न काढण्याची विनंती केली़ दरम्यान, या परिसरात पेट्रोलिंगवर असलेले पोलीस कर्मचारीही एव्हाना घटनास्थळी पोहोचले व या तरुणीला घेऊन गेले़ कारने जात असताना अचानक लक्ष गेले आणि ही युवती उडी मारण्याच्या तयारीत दिसली़ कार थांबवेपर्यंत तिने पाण्यात उडीही मारली होती़ त्याचवेळी मग कोणताही विचार न करता मी पाण्यात उडी मारली आणि गाळातही फसलो़ यानंतर स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत पोहोत जाऊन तिच्यापर्यंत पोहोचलो व संपूर्ण ताकदीनिशी तिला खेचून पाण्याबाहेर काढले़ मी खूप वेगळे असे काहीही केले नसून माझे कर्तव्य पार पाडले आहे़ - अश्मंत दातरंगे, युवक
साहसी अश्मंतने वाचविले वैफल्यग्रस्त तरुणीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:50 AM