नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातून दर बुधवारी वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आता बुधवारसह शुक्रवारी देखील देण्याबाबतचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहे. प्रहार संघटनेने दिव्यांगांच्या या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार येत्या ६ ऑगस्टपासून आठवड्यातून दोनदा प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रहार संघटनेने कळविले आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील दिव्यांगांना दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे लांबून आलेल्या दिव्यांगांना माघारी परतावे लागत असल्याने प्रहार अपंग संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांना निवेदन दिले. कोरोनामुळे अनेक दिवसांपासून दिव्यांग प्रमाणपत्र वाटप बंद होते. शासनाच्या आदेशान्वये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपास सुरुवात केली. मात्र, अतिशय संथ गतीने कामकाज सुरू असल्याच्या तक्रारी प्रहार अपंग संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने अनेक दिव्यांग बस व रेल्वे प्रवास सवलती तसेच शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. यासाठी आठवड्यातून एकच दिवस असल्याने दोन दिवस करून दिव्यांगांची हेळसांड थांबवावी अशी मागणी प्रहार अपंग संघटना नाशिकचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मानकर यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार येत्या ६ ऑगस्टपासून बुधवारसह दर शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल व शुक्रवारी प्रत्येक तालुकानिहाय दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाईल. सुरुवातीस आदिवासी तालुक्यांना प्राधान्य दिले जाणार असून प्रथम सुरगाणा तालुक्यातून सुरवात केली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी संघटनेचे पदाधिकारी यांना सांगितले.
दर बुधवारी ही ग्रामीण भागातील सर्व दिव्यांगाना प्रमाण वाटप सुरू राहील असे ही थोरात यांनी सांगितले. या प्रसंगी प्रहार अपंग संघटना नाशिकचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मानकर, उपतालुकाध्यक्ष दत्ता मांडे, देवळा तालुकाध्यक्ष बाळू बैरागी, अर्जुन देवरे, विलास चौधरी, विजय भुसारे, शरद नरवडे, शिवाजी खांडबहाले, आशा नरवडे, विलास कदम आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
290721\29nsk_32_29072021_13.jpg
जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना निवेदन देतांना संतोष मानकर,दत्ता मांडे , बाळु बैरागी, अर्जुन देवरे, विलास चौधरी, विजय भुसारे, शरद नरवडे, शिवाजी खांडबहाले, आशा नरवडे, विलास कदम, आदि